पंतप्रधान मोदींची 'बर्थ डे डिप्लोमसी' भारत-पाक संबंधांच्या पथ्यावर?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आकस्मिक पाकिस्तान भेटीमुळं सर्वांनाच धक्का बसलाय. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवशी मोदींनी त्यांची भेट घेतली. मोदी-शरीफ भेटीचं उभय देशांतून स्वागत होत असताना, शिवसेनेनं मात्र त्यावर नाकं मुरडलंय.

Updated: Dec 26, 2015, 09:45 AM IST
पंतप्रधान मोदींची 'बर्थ डे डिप्लोमसी' भारत-पाक संबंधांच्या पथ्यावर? title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आकस्मिक पाकिस्तान भेटीमुळं सर्वांनाच धक्का बसलाय. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवशी मोदींनी त्यांची भेट घेतली. मोदी-शरीफ भेटीचं उभय देशांतून स्वागत होत असताना, शिवसेनेनं मात्र त्यावर नाकं मुरडलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 'सरप्राइझ बर्थ डे गिफ्ट' दिलं. अफगाणिस्तान दौऱ्याहून परतताना मोदींनी अचानक पाकिस्तानात जाऊन, शरीफ यांना शुभेच्छा द्यायचं ठरवलं. मोदींच्या या मास्टरस्ट्रोकनं सर्वांनाच सुखद धक्का दिला. मोदींचं विमान लाहोरला लँड झालं, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शरीफ स्वतः उपस्थित होते. मोदींनी गळाभेट घेऊन शरीफ यांना बर्थ डे विश केलं... तिथून ते दोघेही खास विमानानं शरीफ यांच्या घरी पोहोचले. तिथं त्यांनी शरीफ कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. तब्बल तीन तास मोदी पाकिस्तानात होते. त्यांची ही बर्थ डे डिप्लोमसी भारत-पाक संबंधांच्या दृष्टीनं मोठं सकारात्मक पाऊल मानलं जातंय.

तर ही सरप्राइज व्हिजिट नसून, मोदींचा दौरा पूर्वनियोजित असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केलाय. एकीकडं मोदींच्या या मास्टरस्ट्रोकचं स्वागत होतंय. तर दुसरीकडं शिवसेनेनं मात्र दाऊदचा मुद्दा उकरून काढत, कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली. आपले पंतप्रधान पाकिस्तानला गेले ही खूपच मोठी गोष्ट आहे. मात्र, दाऊदला ते परत आणू शकले तर त्यांच्या दौऱ्याचे स्वागत होईल, अशी प्रतिक्रिया सेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय.

११ वर्षांआधी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी पाकिस्तानात जाऊन मैत्रीचा नवा अध्याय सुरू केला होता. मोदींनीही पाकिस्तान भेटीसाठी मुहूर्त शोधला तो वाजपेयी आणि शरीफ यांच्या वाढदिवसाचाच. आता मोदींच्या बर्थ डे डिप्लोमसीला शरीफ काय रिटर्न गिफ्ट देतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.