नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेत हिजबुल मुजाहिद्दीनचा मृत कमांडर बुरहान वानी याला 'नेता' म्हणून संबोधनं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चांगलंच महागात पडू शकतं. हेच भाषण त्यांच्या अडचणी वाढवणार असं दिसतंय.
पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश घोषित करावा, असा प्रस्ताव एका अमेरिकन खासदारानं दिलाय. यासाठी त्यांनी पुरावा म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेत नवाझ शरीफ यांनी दिलेलं भाषणाची प्रत दिलीय.
नवाझांच्या या भाषणावरून पाकिस्तानात खुलेआमपणे दहशतवादाला आश्रय मिळत असल्याचं खासदार टेड पोए यांनी अमेरिकन संसदेत म्हटलंय. 'पाकिस्तानचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्रात आपल्या भाषणादरम्यान एका हिंसा पसरवणाऱ्या दहशतवादी समुहाचं कौतुक करत आहेत, हे पाहून मी निराश आहे' असं टेड यांनी म्हटलंय.
Disappointed to see the Pakistan PM use the @UN to praise a militant group that uses violence to promote its cause. https://t.co/FDsWOY7fhB
— Ted Poe (@JudgeTedPoe) September 28, 2016
'नुकतीच बुरहान वानीसारख्या तरुण नेत्याची काश्मीरमध्ये हत्या करण्यात आली... जो आज काश्मीरी जनतेचा रोल मॉडेल बनला होता' असं शरीफांनी या भाषणादरम्यान म्हटलं होतं. शिवाय, पाकिस्तानला काश्मीरच्या माता, भगिनी आणि मुलांचा आनंद हवाय... यासाठी आम्ही महासभेकडे हा मुद्दा सोडवण्याची विनंती करतो, असंही शरीफ यांनी म्हटलं होतं.