www.24taas.com, वॉशिंग्टन
भारतीय वंशाचे रोमेश वाधवानी यांची अमेरिकेतील जॉन एफ केनेडी परफॉर्मिंग आर्ट संस्थेच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आलीए. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची निवड केली आहे. वाधवानी यांनी मुंबईतील आयआयटीमधून पदवी घेतली आहे.
वाधवानी यांच्यासह ९ जणांची निवड करताना ओबामा म्हणाले, “हे सर्व समर्पित विश्वस्त आपल्या अनुभवांमुळे आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडू शकतील. या लोकांच्या हातात कारभार सोपवल्याचा मला अभिमान वाटतो.”
१९७१ साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. कॅनेडी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जॉन एफ केनेडी परफॉर्मिंग आर्ट या संस्थेची निर्मिती करण्यात आली होती. ही संस्था दरवर्षी साधारण २ कोटी प्रेक्षकांसाठी २००० कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध करून देते.
वाधवानी यांनी आयआयटी, मुंबईमधून बीए केल असून कार्नेज-मेलन युनिव्हर्सिटीमधून एमएस आणि पीएचडी केली. वाधवानी सिम्फनी टेक्नोलॉजी ग्रुपचे संस्थापक, चेअरमन आणि सीईओ आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी काम केलं आहे.