लॉटरीद्वारे निवड होणार मोदींच्या न्यू यॉर्कमधील समारंभातील पाहुण्यांची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर महिन्यातील अमेरिका दौऱ्याबद्दल सर्वांनाच मोठी उत्सुकता असून २८ सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या मोदींच्या 'सार्वजनिक स्वागत समारंभास' उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांची निवड लॉटरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

PTI | Updated: Sep 3, 2014, 06:00 PM IST
लॉटरीद्वारे निवड होणार मोदींच्या न्यू यॉर्कमधील समारंभातील पाहुण्यांची  title=

वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर महिन्यातील अमेरिका दौऱ्याबद्दल सर्वांनाच मोठी उत्सुकता असून २८ सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या मोदींच्या 'सार्वजनिक स्वागत समारंभास' उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांची निवड लॉटरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित 'मॅडिसन स्क्वेअर गार्डन' इथं हा सोहळा पार पडणार आहे. 

अमेरिकेमधील भारतीय वंशाच्या नागरिकांच्या अनेक संस्थांच्या एकत्रित समन्वयामधून स्थापन करण्यात आलेली इंडियन-अमेरिकन कम्युनिटी फाऊंडेशन ही संस्था हा कार्यक्रम आयोजित करत असून सोमवारी मध्यरात्रीपर्यंत देशभरातून २० हजार इच्छुकांनी अर्ज केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यात अलास्का आणि हवाई यासारख्या अमेरिकेचं दुसरं टोक असलेल्या प्रांतांमधूनही आलेल्या अर्जांचाही समावेश आहे. 

भारतीय- अमेरिकन समुदायाच्या ४०७  ऑर्गनायझेशन्स आणि धार्मिक संस्थेच्या सदस्यांना या समारंभातील सहभागासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. तर सामान्य जनतेला या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी होता यावं यासाठी मंगळवारपासून अर्ज स्वीकारायला सुरूवात झाली. सामान्य नागरिकांना ७ सप्टेंबरपर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत.

या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत असले तरी  'मॅडिसन स्क्वेअर गार्डन' इथं २० हजार नागरिक बसण्याचीच क्षमता असल्यामुळं आयोजकांनी लॉटरीच्या माध्यमातून नागरिकांची निवड करून त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला असून असं निवेदन या संस्थेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलंय. 

शिकागो इथं १८९३ साली स्वामी विवेकानंद यांचं भाषण मी ऐकलेलं नाही, मात्र आता न्यूयॉर्कमध्ये आणखी एका 'नरेंद्रंचे' ऐतिहासक भाषण ऐकण्याची संधी मला चुकवायची नाहीये,‘ अशी प्रतिक्रिया जॉर्जटाऊन विद्यापीठात कार्यरत असलेल्या अंजू प्रीत या शास्त्रज्ञानं व्यक्त केली

मोदींच्या समारंभात सहभागी होण्यासाठी लोकांचा मिळत असलेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला अपेक्षितच असल्याचे एका आयोजकांनी सांगितले. 'मोदींची लोकप्रियता पाहता अशा समारंभासाठी ६० ते ७० हजार आसनक्षमता असलेलं स्टेडियमही कमीच पडलं असतं. या कार्यक्रमासाठी आम्ही न्यू यॉर्क आणि न्यूजर्सी इथल्या दोन स्टेडियम्स घेण्याचा आमचा प्रयत्न होता, पण ती दोन्ही आधीपासूनच बुक असल्यानं अखेर आम्ही 'मॅडिसन स्क्वेअर गार्डन'ची निवड केली, असं ते म्हणाले. 'हा सोहळा अविस्मरणीय ठरेल' , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.