`फायर आइस`चा शोध... जपानला संजीवनी!

जपानच्या वैज्ञानिकांनी समुद्रतळाच्या तळाशी जाऊन ‘मिथेन हायड्रेट’ नावाचा गॅस शोधून काढलाय. याचा फायदा येणाऱ्या शंभर वर्षांपर्यंत इंधन म्हणून केला जाऊ शकतो, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 13, 2013, 10:23 AM IST

www.24taas.com, टोकियो
जपानच्या वैज्ञानिकांनी समुद्रतळाच्या तळाशी जाऊन ‘मिथेन हायड्रेट’ नावाचा गॅस शोधून काढलाय. याचा फायदा येणाऱ्या शंभर वर्षांपर्यंत इंधन म्हणून केला जाऊ शकतो, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केलाय. त्यामुळे इंधनाची चणचण संपून ऊर्जेचा प्रश्न मार्गी लागू शकेल, असं म्हटलं जातंय. मिथेन वायूचा ठासून भरलेला साठा आणि बर्फाच्छादित गोल आकाराच्या या गॅसला त्यांनी ‘फायर आइस’ असं नाव दिलंय.
जपान सरकारच्या ऑइल, गॅस आणि मेटल कॉर्पोरशन या संस्थेने नव्या ऊर्जास्रोतांच्या शोधार्थ समुद्रात मारलेली डुबकी पुढच्या किमान १०० वर्षांचा इंधन साठा घेऊन वर आलीय. प्रक्रिया करून वायू व द्रवरूप इंधन तयार करणे शक्य असल्याचा विश्वाऑस संशोधकांना आहे. नैसर्गिक रूपातून त्याला वापरायुक्त फॉर्ममध्ये आणण्यासाठी तंत्रज्ञ कामाला लागलेत. मार्च २०१९ पर्यंत याच्या जागतिक पातळीवरील व्यावसायिक उत्पादनास सुरुवात होऊ शकेल, असं त्यांचं म्हणणं आहे. आज प्रशांत महासागराच्या मंथनातून ‘फायर आइस’ हे पर्यायी इंधन मिळाल्याने, आकाशासारखाच पाताळाचाही अर्मयाद ठाव घेतला जाईल.
जपानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या पश्चिम भागात शिकोकू बेटावरील खोदकामादरम्यान १.१ खरब क्यूबिक मीटर इतक्या मोठ्या प्रमाणात हा गॅस सापडलाय. २०१२ मध्ये जपान आणि अमेरिकेनं अलास्कामध्ये या गॅसच्या शोधासाठी खोदकाम सुरू केलं होतं.

‘फायर आईस’ची वैशिष्ट्यं
 बर्फासारखे आवरण आणि हाताळल्यावर त्याच्याप्रमाणेच गारेगार अनुभुती देणारे हे इंधन मूळ रूपात ज्वालाग्राही आहे. परस्परविरोधी अशी प्रकृती वैशिष्ट्यामुळेच याचं नामकरण ‘फायर आइस’ असं करण्यात आलंय.
 गोल बर्फाच्या खड्यासारख्या दिसणाऱ्या ‘फायर आइस’मध्ये मिथेन वायू ठासून भरलाय.
 ज्वलनाच्या चाचणीत मिथेन वायूने पेट घेतला व यातून पाण्याचा अंश बाहेर पडला.
 यातून वायू तसेच द्रवरूप असे दोन्ही प्रकारचे इंधन तयार करता येईल, असं संशोधकांना वाटतंय.
 जपानच्या ऊर्जा विभागानं दिलेल्या माहितीनुसार ‘फायर आइस’मध्ये पाहणं म्हणजे एखाद्या थ्रीडी स्वरुपात पाहणं.
 गेली कित्येक वर्ष ऊर्जा स्त्रोतांसाठी परराष्ट्रांवर अवलंबून राहिलेल्या जपानसाठी हा गॅस एखाद्या संजीवनीपेक्षा कमी नाही.