...अशी होते नव्या `पोप`ची निवड!

पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या ऐतिहासिक राजीनाम्यानंतर रोममधल्या व्हॅटिकन सिटीत नव्या पोपच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. त्यासाठी मतदानाचा अधिकार असलेले जगभरातले १२० कार्डिनल्स इथं दाखल झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 13, 2013, 07:54 AM IST

www.24taas.com, व्हॅटिकन सिटी
पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या ऐतिहासिक राजीनाम्यानंतर रोममधल्या व्हॅटिकन सिटीत नव्या पोपच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. त्यासाठी मतदानाचा अधिकार असलेले जगभरातले १२० कार्डिनल्स इथं दाखल झालेत.

नक्की कशी होते ही निवडणूक?
कोण होणार नवा पोप? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सिस्टाईन चॅपलमध्ये सगळे कार्डिनल्स एकत्र जमलेत. या निवडणुकीत ६९ देशांचे १२० कार्डिनल्स सहभागी झालेत. पोप होण्यासाठी फक्त तीनच अटी आहेत. तुम्ही पुरुष असायला हवं, बाप्तिस्त असायला हवं आणि वय ८० वर्षांपर्यंत जास्त नको...
‘सिस्टाईन चॅपल’च्या छतावर आणि भिंतीवर मायकल अँजेलोच्या अखेरच्या न्यायाचं ‘द लास्ट जजमेंट’चं अतिशय भव्य पेन्टींग साकारण्यात आलंय. आणि त्यामध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेत येशू आहे. म्हणूनच ‘सिस्टाईन चॅपलमध्ये’च नव्या पोपची निवडणूक होते. या निवडणुकीदरम्यान सगळ्या कार्डिनल्सना बाहरेच्या जगात कुणाशीही संपर्क साधायला मनाई असते. रेडिओ, टीव्ही आणि मोबाईल्स वापरायला परवानगी नसते.

निवडणूक प्रक्रिया
पोपची निवडणूक प्रक्रिया साधारण तीन दिवस चालते. पोपच्या निवडीसाठी उपस्थित कार्डिनल्सपैकी दोन तृतीयांश मतांची गरज असते. रोज सकाळी आणि दुपारी असं दोन वेळा मतदान होतं. प्रत्येक कार्डिनल्सला एक आयताकृती कार्ड दिलं जातं. त्यावर ते आपल्या पसंतीच्या उमेदवाराचं नाव लिहीतात. जोपर्यंत स्पष्ट बहुमत मिळत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहते. तीन दिवसांत निवड झाली नाही, तर ज्येष्ठ कार्डिनल्स पोपची निवड करतात.
पोपची निवड झाल्याचे संकेत देण्याची पद्धत मोठी मजेशीर आहेत. निवडणुकीतल्या प्रत्येक फेरीनंतर चॅपलच्या चिमणीमधून एक विशिष्ट प्रकारचा धूर सोडला जातो. त्या फेरीत पोपची निवड झाली नसली तर एक केमिकल त्या धूरात मिसळलं जातं. ज्यावेळी पोपची निवड होते, त्यावेळी स्वच्छ पांढरा धूर चिमणीबाहेर सोडला जातो आणि घंटाही वाजवली जाते तेव्हा बाहेर उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना आणि सगळ्या जगालाच पोपच्या निवडीची बातमी कळते.