www.24taas.com, मुंबई
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये, अशी शिफारस २५ अमेरिकन खासदारांनी केलीय. या आधीही अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला होता. २००२ च्या दंगलीतील पीडितांना अजूनही न्याय मिळालेला नाही त्यामुळे मोदींना व्हिसा देऊ नये, असं या खासदारांनी हिलरी क्लिंटन यांच्याकडे निक्षून सांगितलं. या संदर्भात २९ नोव्हेंबरला खासदारांनी हिलरी क्लिंटन यांना पत्र पाठवलं होतं.
मोदी सरकार २००२ च्या गुजरात दंगलीमधील पीडितांना न्याय मिळवून देण्यास अपयशी ठरल्याचं या अमेरिकन खासदारांनी म्हटलंय. २९ नोव्हेंबर रोजी क्लिंटन यांना पाठवण्यात आलेलं हे पत्र काल मीडियासमोर दाखल करण्यात आलंय. काँग्रेस सदस्यांनी या पत्रात ‘भारतात एक मजबूत लोकशाही आहे. जी उल्लेखनीय नेतृत्व आणि प्रगतीची अपेक्षा ठेवून आहे. गुजरात दंगलींमध्ये नाव जोडलं गेलेलं असूनही भारतातील काही राजकीय पक्ष मोदींना पाठिंबा देत आहेत, ही लांछनास्पद गोष्ट आहे. अमेरिकेत येण्याची परवानगी म्हणजे मानवाधिकार कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या जबाबदाऱ्यांपासून सुटकारा करून घेण्यास संधीच मोदींना मिळणार आहे’.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमेरिकन खासदारांचं हे पत्र जाहीर झाल्यामुळे आता मोदी या पत्राला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.