लॉस एंजेलिस : भारतीय - अमेरिकन योग गुरू बिक्रम चौधरी यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. बिक्रम चौधरी यांनी आपलंही लैंगिक शोषण केलं असा आरोप मुंबईच्या योगगुरु मनदीप कौर संधू यांनी केला आहे. संधू या ब्रिकम चौधरीविरोधात साक्ष देणाऱ्या 70 जणांपैकी एक आहेत.
2009 मध्ये मी चौधरींच्या लॉसएंजेलीसच्या शिबिराला हजेरी लावायला सुरुवात केली. या शिबीराच्या एक दिवस आधी माझी चौधरींशी भेट झाली. तेव्हा त्यांच्या माणसानी मला मसाज करता येतो का असा प्रश्न विचारला. मी हो सांगितल्यानंतर चौधरींनी मला त्यांच्या खोलीत भेटायला बोलावलं. असं संधूंनी सांगितलंय. त्या खोलीत ब्रिकम चौधरी आपल्या आतल्या कपड्यांवर आल्याचा आरोपही संधूनी केलाय. ब्रिकमला मी जवळपास दीड तास मसाज केला पण त्यावर बिक्रम नाराज झाल्याचा दावाही संधूनी केलाय.
याच शिबीरादरम्यान एक दिवस रात्री 2 वाजता मला ब्रिकमनं बोलावलं आणि त्याच्या गुप्तांगाचा मसाज करायला सांगितला पण मी याला नकार देत तिथून पळ काढला असं संधू म्हणाल्या आहेत. मी ज्याला गुरु मानलं त्याच्या अशा वर्तनामुळे मला धक्का बसला, काय करायचं तेच मला कळत नव्हतं म्हणून मी तक्रार दाखल केली नाही, अशी प्रतिक्रिया संधूंनी दिली आहे.
लैंगिक छळ केल्याप्रकरणी नुकताच लॉस एंजेलिस कोर्टानं बिक्रम चौधरीला 9 लाख 25 हजार डॉलर्सचा दंड ठोठावला होता.