www.24taas.com, झी मीडिया, दुबई
सध्या कोकणातला हापूस मुंबई पेक्षा दुबईकरांना स्वस्तात मिळतोय. युरोपियन राष्ट्रांनी येत्या एक मे पासून भारतीय हापूस आंब्यांवर बंदी घातली आहे, त्यामुळे केवळ दुबईच्या मार्केटमध्ये हापूस आंबा जातोय.
दुबईत आंबा स्वस्त झाला असल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजारात देखील आवक वाढली आहे. इथं रोज एक लाखाहून जास्त पेटींची आवक होतेय. आकाराने लहान आणि कमी दर्जाच्या आंब्याची पेटी ५०० ते एक हजार रुपयांना मिळत आहे.
सध्या दुबईत सवा डझन आंब्याचा दर 14 दिरामपर्यंत खाली आलाय. एका दिरामची किंमत 15 रुपये असल्याने निर्यातदाराला सवा डझन आंब्यामागे फक्त 30 रुपये मिळत आहेत. दुबईच्या मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आंबा गेल्याने तेथील आंब्याचे दर खाली उतरले आहेत. त्यामुळे निर्यातदारांना दुबईला आंबा पाठवणे खर्चिक होतंय.
आंब्याच्या निर्यातीसाठी विशेष गोदाम तयार करा, अशी सूचना युरोपियन देशांनी केंद्र सरकारला केली होती. मात्र त्यासाठी पाच कोटींचा खर्च निर्यातदार करू शकत नव्हते. सरकारनेही त्याकडे दूर्लक्ष केलंय. त्यामुळे सध्या युरोप देशात आंबा निर्यात करता येत नाही.
युरोपातील निर्यात बंद झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना मुंबई मार्केटमध्ये माल आणावा लागत आहे. ही स्थिती बदलली तरच आंबा उत्पादनांना सोन्याचे दिवस येतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.