कल्याणमध्ये खंडणीसाठी 12 वर्षाच्या मुलाची हत्या

कल्याण शहरात 50 लाखाच्या खंडणीसाठी एका सोने-चांदी व्यापा-याच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

Updated: Apr 27, 2014, 09:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
कल्याण शहरात 50 लाखाच्या खंडणीसाठी एका सोने-चांदी व्यापा-याच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. मात्र याप्रकरणात पोलिसांवरही हलगर्जीपणाचा आरोप होतोय.
कल्याणमध्ये रोहन नावाच्या बारा वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन खंडणीसाठी त्याची हत्या केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. कल्याणमध्ये सोने चांदी दागिन्याचा व्यवसाय करणा-या उत्तम गुचित यांच्या घरावर या नराधमाची नजर होती.
काही दिवसांपूर्वी घरात आणि दुकानात वायरिंगचं काम करताना सारी पाहणी केली आणि रोहनच्या अपहरणाचा कट रचला. 17 एप्रिलला रोहन आपल्या मित्रांसह खेळत असताना कुरियर बॉय बनून आलेल्या या नराधमांनी त्याचं अपहरण केलं.

रोहनचं 17 तारखेला अपहरण झाल्यानंतर 21 एप्रिलला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात त्याचे पाय कापलेल्या अवस्थेत आढळले. तर शनिवारी रोहनचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत एका नाल्यात आढळला. निवडणुकांच्या कामात पोलिसांनी प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होतोय.

पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळलेत.. तपासात हलगर्जीपणा झाल्याचं आढळून आल्यास कारवाईचं आश्वासन पोलिसांनी दिलंय.
दरम्यान या आरोपींना कोर्टात हजर केले असता 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. पोलिसांवर आरोप होत असले तरी यांत एका चिमुकल्याचा यांत नाहक बळी गेलाय. त्यामुळं अशा घटनांपासून बोध घेत पोलिसांनीही अधिक सजग राहण्याची मागणी होतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.