२४ तासानंतरही १६२ प्रवाशांसह एअर एशियाचं विमान बेपत्ता!

एअर एशियाचं इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला जाणारं विमान १६२ प्रवाशांसह बेपत्ता झालंय. त्यानंतर २४ तासांच्या अथक शोधानंतरही त्याचा कसलाही मागमूस लागलेला नाही. प्रवाशांत १६ लहान मुले आणि नवजात अर्भक यांचा समावेश आहे. 

PTI | Updated: Dec 29, 2014, 08:02 AM IST
२४ तासानंतरही १६२ प्रवाशांसह एअर एशियाचं विमान बेपत्ता! title=

जकार्ता/सिंगापूर: एअर एशियाचं इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला जाणारं विमान १६२ प्रवाशांसह बेपत्ता झालंय. त्यानंतर २४ तासांच्या अथक शोधानंतरही त्याचा कसलाही मागमूस लागलेला नाही. प्रवाशांत १६ लहान मुले आणि नवजात अर्भक यांचा समावेश आहे. 

मलेशियन एअर लाइन्सच्या बेपत्ता विमानाचं गूढ कायम असतानाच झालेल्या या नव्या अपघातानं जगाला हादरवून टाकलं असून, या वर्षात झालेला हा तिसरा मोठा विमान अपघात आहे. या विमानात भारतीय प्रवासी नव्हतं, अशी प्राथमिक माहिती आहे.

सुराबायाहून पहाटे ५.२० वाजता निघालेलं हे विमान सकाळी ८.३० वाजता सिंगापूरच्या चांगी विमानतळावर उतरणार होतं. विमानानं उड्डाण करून ४२ मिनिटं झाली तेव्हा खराब हवामानामुळं या विमानाच्या वैमानिकानं मार्ग बदलण्याची परवानगी मागितली होती. मात्र नंतर त्याचा संपर्क तुटला. या अपघातात कोणीही वाचलं असण्याची शक्यता मावळत असून एअरबस ३२०-२०० या विमानाचा शोध घेण्यासाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी इंडोनेशियानं दोन लष्करी विमानं तैनात केली आहेत. 

अंधार आणि खराब हवामानामुळं रविवारी सायंकाळी शोधमोहीम बंद करण्यात आली. काही जहाजं रात्रीही शोध घेत राहिली, पण सर्वंकष शोधमोहीम पुन्हा सकाळी सुरू झालीय. एअर एशिया ही इंडोनेशियन हवाई कंपनी असून, अपघातग्रस्त विमानात १५५ प्रवासी आणि ७ कर्मचारी होते.

इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील इंधन कधीच संपलं असावं. विमानाबाबत अनेक वृत्तं येत आहेत, पण त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हे विमान सुमात्रा बेटाच्या पूर्व किनारपट्टीजवळ बालितुंग इथं कोसळलं. या अपघाताचं नक्की स्थान कळलेलं नाही, असं वृत्त प्रसारित होत असलं तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मलेशियाचे वाहतूकमंत्री लिओ तियांग लाई यांनी विमानाचे अवशेष सापडले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. विमान बालितुंगजवळ पडल्याचं वृत्त निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, एअर एशियाचं विमान क्यूझेड ८५०१ हे बेपत्ता झाल्यानंतर एअर एशियानं ट्विटरवर आणि फेसबुकवरील लोगोचा रंग बदलून करडा केला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.