दुबईत नोकरीची स्वप्न पाहणारे तरुण पोहचले `इराक`मध्ये!

पंजाबच्या अनेक भागांतून परदेशात नोकरी करण्याची इच्छा बाळगणारे जवळपास 40 पंजाबी युवक आधीच पेटलेल्या इराकमध्ये पोहचलेत

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 20, 2014, 01:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमृतसर
परदेशात नोकरीच्या आमिषाने जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी... पंजाबच्या अनेक भागांतून परदेशात नोकरी करण्याची इच्छा बाळगणारे जवळपास 40 पंजाबी युवक आधीच पेटलेल्या इराकमध्ये पोहचलेत. हे सगळे तरुण एजंटमार्फत अवैधरित्या इराकमध्ये दाखल झालेत. आखाती देशांमध्ये नोकरी देऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून या एजंटसनी या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं उघड झालंय.
महिना 1000-1200 डॉलर्स पगाराची नोकरी मिळवून देतो, असं सांगून या युवकांची एजंटकडून दिशाभूल केली गेली. यासाठी या युवकांनी एजंटला 2-4 लाख रुपयेही दिले. हे एजंट अवैध वाहतूक करणाऱ्या काही एजंटसच्या संपर्कात असल्याचंही उघड झालंय.
कशी होते गरजू तरुणांची दिशाभूल
इराकमध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या क्वचितच कुणी इराकमध्ये नोकरीसाठी जाण्यास तयार होईल. त्यामुळे या जॉब एटंसनं दुबईमध्ये जॉब मिळवून देतो असं सांगून टुरिस्ट व्हिजावर या तरुणांना दुबईला तर पाठवलं... पण, काही कारणास्तव ठरलेल्या कंपनीमध्ये नोकरी मिळण्यात काही अडचणी निर्माण झाल्यात, असं सांगून या तरुणांना काही दिवस काहीही काम न देता बसवून ठेवलं जातं.
वैतागलेले हे तरुण जेव्हा काम आणि पैसा मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात तेव्हा या तरुणांना एजंटकडून इराकमध्ये काम करण्याची ऑफर दिली जाते... आणि कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे हे हतबल तरुण ही ऑफर स्वीकारतात.
अवैध मार्गानं होते मानवी तस्करी…
त्यानंतर या तरुणांना कोणत्याही डॉक्युमेंटशिवाय अवैध मार्गानं इराकमध्ये पाठवलं जातं, अशी माहिती दुबर्स्थित व्यावसायिक एस. ओबेरॉय यांनी दिलीय. ओबेरॉय यांची ‘सरबात दा भला चॅरिटेबल ट्रस्ट’ पंजाबमध्ये अशाच काही तरुणांच्या मदतीचं काम करतेय.

या तरुणांना चोरीछुप्या पद्धतीनं दुबई, कतार किंवा कुवैत मार्गे इराकला धाडलं जातं. काही वेळेला त्यांना सागरी मार्गानंही अवैधरित्या ‘ट्रान्सपोर्ट’ केलं जातं.
महिन्याला 1,200 दिरहम देण्याचं आश्वासन दिलेलं असताना अर्ध्याहून कमी पगारावर या फसवणूक झालेल्या तरुणांना इराकमध्ये काम करावं लागतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.