इराक यादवी :अपहृत 40 भारतीयांपैकी एक पळून जाण्यात यशस्वी

मीडिया रिपोर्टनं केलेल्या दाव्यानुसार, इराकमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांपैकी एक व्यक्ती दहशतवाद्यांच्या तावडीतून स्वत:ची सोडवणूक करण्यात यशस्वी झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 20, 2014, 01:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मीडिया रिपोर्टनं केलेल्या दाव्यानुसार, इराकमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांपैकी एक व्यक्ती दहशतवाद्यांच्या तावडीतून स्वत:ची सोडवणूक करण्यात यशस्वी झालाय. तसंच त्यानं भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचंही समजतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, इराकच्या `रेड क्रेसेंट`च्या प्रमुखांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिलाय. एक भारतीय `आयएसआयएस` या संघटनेच्या दहशतवाद्यांपासून आपला जीव वाचवण्यात यशस्वी झालाय आणि तो उत्तर इराक शहराच्या इरबिल या भागात सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, इराकमध्ये अपहरण झालेल्या ४० भारतीयांचं ठिकाण समजल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय. मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नसल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी माहिती दिलीय.
मंत्रालय सातत्यानं इराक सरकारच्या संपर्कात आहे. भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, अपहृत नागरिकांच्या नातलगांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. इराकमध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी सरकारनं युद्धपातळीवर प्रयत्न करावेत आणि त्यांना सुखरूप मायदेशी घेऊन यावं अशी मागणी या नातलगांनी स्वराज यांच्याकडे केलीय. परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलंय.
इराकमध्ये अपहरण झालेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचं नितीन गडकरी गडकरी यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यात याबाबत चर्चा झाली असून या चर्चेत आपणही सहभागी झालो होतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिलीय. अपहरण झालेल्या भारतीयांना कोणतीही इजा होऊ देणार नाही, त्यांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावू असं ते म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.