झी २४ तास वेब टीम, लॉस अँजेलिस
संगीत आणि नृत्याने जगावर मोहिनी घालून गेलेल्या मायकल जॅक्सनची मोहिनी त्याचा २००९ मध्ये मृत्यू झाल्यानंतरही अद्याप कमी झालेली नाही. मृत सेलिब्रिटींच्या उत्पन्नाची यादी 'फोर्ब्स डॉट कॉम' या संकेतस्थळाने प्रसिद्ध केली, यात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मायकल पहिल्या स्थानावर आहे.
वयाच्या पन्नासाव्या वर्षी निधन झालेल्या मायकलने गेल्या वर्षभरात सुमारे १७ कोटी डॉलर कमाविले. विशेष म्हणजे जिवंत 'पॉप' संगीतकार-गायकांच्या उत्पन्नाच्या यादीतही मायकलचे स्थान दुसऱ्या स्थानावर राहील, एवढे त्याचे गेल्या वर्षीचे उत्पन्न आहे.
मायकलच्या खालोखाल 'रॉक एन् रोल'चा सम्राट एल्वीस प्रेस्ली असून, त्याने गेल्या वर्षी साडेपाच कोटी डॉलरची कमाई केली. कथितरीत्या डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू झालेल्या 'किंग ऑफ पॉप' मायकल जॅक्सनच्या अल्बम व इतर वस्तूंची विक्री गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे ती १९६२ मध्ये अवघ्या ३६व्या वर्षी मृत पावलेली हॉलिवूडची सौंदर्यवती मर्लिम मन्रो, तिने गेल्या वर्षी दोन कोटी ७० लाख डॉलरची कमाई केली.