तालिबानी शवांची विटंबना करणाऱ्यांची चौकशी

सध्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर दिसणाऱ्या व्हिडिओंमध्ये अमेरिकन मरीन सैनिक अफगाणिस्तानमधल्या तालिबान्यांच्या प्रेतांवर लघवी करताना चित्रित करण्यात आले आहेत. या घटनेचा मुस्लिम गटांनी कडाडून निषेध केला आहे.

Updated: Jan 12, 2012, 10:37 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

 

सध्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर दिसणाऱ्या व्हिडिओंमध्ये अमेरिकन मरीन सैनिक अफगाणिस्तानमधल्या तालिबान्यांच्या शवांवर लघवी करताना चित्रित करण्यात आले आहेत. या घटनेचा मुस्लिम गटांनी कडाडून निषेध केला आहे. मुस्लिम संघटनांनी केलेला हा निषेध लक्षात घेऊन पेंटागॉनला या व्हिडिओंच्या अस्सलतेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

यातल्या व्हिडिओमध्ये चार अमेरिकन मरीन सैनिक आपल्या सैन्याच्या गणवेषात उभे असून रक्तबंबाळ शवांवर लघवी करत असल्याचं चित्रित केलं गेलं आहे. आपलं चित्रिकरण   होत असल्याची सैनिकांना पूर्वकल्पना असल्याचंही या व्हिडिओमधून जाणवतं. या व्हिडिओत एक मरीन सैनिक लघवी करून झाल्यावर “मित्रांनो, तुमचा दिवस चांगला जावो” असं म्हणतानाही दाखवला आहे.

 

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्समध्ये सैन्यातील अधिकाऱ्यांशी बोलून असं सांगितलं गेलं आहे की या सैनिकांच्या हातात जी शस्त्रं दिसत आहेत, त्यावरून प्रथमदर्शनी असं वाटतंय की हे सैनिक वादग्रस्त स्नायपर दलाचे असावेत. अफगाणिस्तानात सुमारे २० हजार मरीन सैनिक तैनात केले गेले असून यातील बहुतांश सैनिक कंदाहार आणि हेलमंद प्रांतात तैनात आहेत. संरक्षण मंत्रालय पांगॉनचे प्रवक्ता नेव्ही कॅप्टन जॉन किर्बी यांनी या व्हिडिओबद्दल हळहळ व्यक्त केली असून या व्हिडिओच्या अस्सलतेची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.