करीमनगर, तेलंगना : आयएएस परीक्षेत नापास झाल्याने एका माथेफिरूने आपल्या आई-वडिलांसह २२ लोकांवर तलवार हल्ला चढविला. हा माथेफिरु तरुण रस्त्याने जाताना प्रत्येकावर हल्ला करत चालला होता. पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र, तो आपले कृत्य करीत राहिला. अखेर पोलिसांनी गोळीबार केला. यात तो ठार झाला.
ठार झालेल्या युवकाचे नाव बलविंदर असे आहे. त्याने दोन पोलिसांवर हल्ला केला. दरम्यान, पोलिसांनी त्याला तलवार फेकण्याचे आवाहन केले. त्याने त्यांचे आवाहन धुडकावून लावले. मात्र, पोलिसांचे काहीही ऐकले नाही, त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला यात त्याचा मृत्यू झाला.
हल्लेखोराचे आई-वडील आणि एक रिक्षा चालक गंभीर जखमी झालेत. या युवकाला रोखण्याचा प्रयत्न करणारे दोन पोलीसही जखमी झालेत. त्यांना एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
करीमनगर कस्बे येथील लक्ष्मीनगर परिसात ही घटना घडली. २८ वर्षीय बलविंदर सिंग तथा बबलू याने हा हल्ला केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक जे. रामा राव यांनी दिली. बबलूचा सकाळी सात वाजता वडील अमृत सिंग आणि आई बेबी कौर यांच्याशी भांडण झाले. त्यानंतर त्याने तलवार हल्ला केला.
पोलिसांनी सांगितले की, बलविंदरने हल्ला केल्यानंतर आई-वडिलांना त्याच अवस्थेत सोडून घराबाहेर पडला आणि त्याने रस्त्याने जाताना दिसेल त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले, की तो आपल्याचे नशेत होता. त्याने एका रिक्षाचालकावर हल्ला केला. यावेळी रक्त सांडलेले दिसत होते.