www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीचे दावे तीन दिवसांत निकालात काढण्यात येणार आहेत. येत्या पाच जुलै रोजी संघटनेची यासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये हा निर्णय संमत झाला तर त्याचा फायदा वर्षाकाठी एक कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
सेवानवृत्तीनंतर अथवा नोकरी सोडल्यानंतर भविष्यनिर्वाह निधीचे (पीएफ) पैसे पदरात पाडून घेण्यासाठी आता ४५ दिवस थांबण्याची गरज लागणार नाही. हे सर्व व्यवहार अवघ्या ७२ तासांत म्हणजेच केवळ तीन दिवसांत पूर्ण होतील. त्यामुळे पीएफ ट्रान्सफर आणि पीएफचे पैसे काढणं आणखी सोप्पं होणार आहे.
`पीएफ` विभागातही आता ‘कम्प्युटरायझेशन’ पूर्ण झालंय. त्यामुळे खात्याकडे एखादा अर्ज आला तर पुढच्या तीन दिवसांत तो निकाली काढणं आता शक्य होणार आहे. याचा लाभ ज्यांना प्रॉव्हिंडट फंडांचे पैसे काढून घ्यायचे आहेत त्यांना तर होईलच पण, नवीन नोकरी स्वीकारल्यावर अथवा नोकरी बदलल्यावर जर पीएफचे खाते हस्तांतरित करायचे असेल तर त्यांचीही प्रक्रिया तीन दिवसांत पार पडेल.
‘पीएफ’ दावेदारांना होणाऱ्या त्रासामुळे ‘ईपीएफओ’ची बरीच नाचक्की झालीय. मागच्या आर्थिक वर्षात (२०१२-१३) संघटनेकडे १.०८ कोटी दावे आले होते. मात्र, दाव्यांचा निपटारा ३० दिवसांच्या आत न झाल्यामुळे १२.६२ लाख दावेकरी असमाधानी होते. यामुळेच प्रलंबित दावे निकालात काढण्यासाठी ईफीएफओने खास मोहीम हाती घेतलीय. यात १५ जूनपूर्वी दाखल करण्यात आलेल्या दाव्यांचा विचार होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.