नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमध्ये भाजपने सर्व शक्तीपणाला लावून निवडणूक लढवली आणि एक ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगत असतांना भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नावीची घोषणा केली आणि भाजप यापुढे उत्तर प्रदेशात कसं काम करते हे पाहण्यासाठी देशभरातील लोकांची उत्सूकता वाढली आहे.
जर उत्तरप्रदेशमध्ये मुथ्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केलीत तर भाजपसाठी ती भविष्यात फायद्याची ठरणार आहेत. राज्यातील सर्व कत्तलखाने २४ तासांच्या आत बंद करण्याचं आणि शेतकरी कर्जमाफीचे दोन मोठी आश्वासने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी निवडणूकीत दिले होते.
सरकार येताच पहिल्या २४ तासात कॅबिनेट बैठकीत हे दोन मोठे निर्णय घेवू असं आश्वासन भाजपने त्यांच्या ३० पानी जाहीरनाम्यात दिले आहे. पण योगी आदित्यनाथ अतिशय कमी वेळेत हे दोन मोठे निर्णय घेऊ शकतात का हा मोठा प्रश्न आहे. राज्यातील शेतकऱ्यांचं ८५ हजार कोटींचं कर्ज सरकार माफ करणार का ?. राज्यातील १२६ कत्तलखाने देखील बंद होतील का ? हे दोन मोठे प्रश्न लोकांसमोर आहेत.
उत्तरप्रदेश हे देशातील केरळनंतर बीफच्या निर्यातीत दुसऱ्या स्थानावर असलेलं राज्य आहे. उत्तर प्रदेशातील कत्तलखाने बंद झाले तर देशाला मिळणारे परदेशी चलनात घट होईल त्यामुळे हे अशक्य असल्याचं कत्तलखान्याचे मालक शमीम कुरेशी यांनी म्हटलं आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं थकबाकी ही देखील उत्तर प्रदेशातली आणखी एक समस्या आहे. उत्तरप्रदेशात साखर कारखाण्याची मोठी लॉबी आहे. किमान आधारभूत किंमत आणि धोरणे ठरविण्यासाठी हे राजकीय पक्षांना देणग्या देतात. कारखाने काकवी आणि इथेनॉलची विक्री करुन मोठा पैसा कमावतात पण शेतकऱ्यांचं ६००० कोटींच थकीत देण्यासाठी चालढकल करतात.
"शेतक-यांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी सरकार अपयशी ठरली तर आम्ही आंदोलन सुरू करु असं शेतकरी नेते वी एम सिंग यांनी म्हटलं आहे. कायदा व सुव्यवस्था, भ्रष्टाचार अशी मोठी आव्हाने योगी आदित्यनाथ यांच्यासमोर असणार आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था राखण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी चीफ सेक्रेटरी राहुल भटणागर आणि डीजीपी जावेद अहमद यांना दिले आहेत.
उत्तरप्रदेशला दररोज २००० मेगावॅट वीजेची कमतरता भासते आहे. गावागावात वीज पोहोचवणे हे आणखी एक आव्हान योगींसमोर असणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये उद्योग धंद्यांना प्रोत्साहन देणे, भ्रष्टाचारमुक्त सरकार हे देखील आव्हान योगींपुढे असणार आहे. राज्यात विकासासाठी योगी कोणतं मॉडेल निवडतात हे देखील पाहावं लागणार आहे. त्यांच्यासमोर तीन मॉडेल आहेत. मोदी मॉडेल, कल्याण मॉडेल आणि गोरखपूर मॉडेल.
उत्तर प्रदेशात भाजप सरकारकडून लोकांची अपेक्षा फार वाढली आहे. येत्या २ वर्षात योगी कसं काम करतात. हिंदुत्वाच्या मुद्दयाला कसं हाताळता यावर २ वर्षात येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं भवितव्य ठरणार आहे.
उत्तर प्रदेशातून सर्वाधिक लोकसभा खासदार निवडून जातात. त्यामुळे उत्तर प्रदेशातून ज्याचे जास्त खासदार निवडून येतात त्यांना सरकार स्थापन करणं तितकंच सोपं जातं. पंतप्रधान मोदींना देखील मोठं यश उत्तर प्रदेशातूनच मिळालं आणि त्यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला.