नवी दिल्ली: बिहारमधील राजकीय संघर्षाचं केंद्र आता दिल्लीत हललं असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
रविवारी बिहारमधील राजकीय संघर्ष दिल्लीत भाजपाच्या दरबारी पोहोचला. नीती आयोगाच्या बैठकीनिमित्त दिल्लीत आलेले बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर जितनराम मांझी यांनी पत्रकार परिषद घेत नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असं टीकास्त्र जितनराम मांझी यांनी सोडलं.
विधानसभेत विश्वासदर्शक आणावा असं आव्हानच मांझी यांनी नितीशकुमार यांना दिलंय. विश्वासदर्शक ठरावात आम्हीच जिंकणार असून ठरावात पराभव झाल्यास मी स्वतःच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन, असं त्यांनी सांगितलं. विश्वासदर्शक ठरावात भाजपाचा पाठिंबा घेणार का? असा प्रश्न मांझी यांना विचारला असता आम्हाला विधानसभेत जे समर्थन देतील त्यांचं स्वागतच असेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं. लालूप्रसाद यादव यांच्या राजदनंही मला पाठिंबा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. तर पंतप्रधानांशी बिहारच्या विकासाबाबत चर्चा केली. मोदींनी बिहारसाठी केलेल्या सहकार्यासाठी त्यांचे आभार, असं त्यांनी म्हटलं आहे.
एकीकडे मांझी यांनी भाजपा दरबारी हजेरी लावली असतानाच बिहारमध्ये नितीशकुमार यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आज दुपारी नितीशकुमार आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या अन्य पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिलं. यामध्ये नितीशकुमार यांना १३० आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. राजद, काँग्रेसच्या आमदारांनीही नितीशकुमार यांना पाठिंबा दिला आहे. उद्या सकाळी सर्व आमदार राज्यपालांची भेटही घेतील असं समजतं. दरम्यान, जदयूमधील अंतर्गत संघर्षाला भाजपा जबाबदार असल्याचा आरोप जदयू नेते करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.