www.24taas.com , झी मीडिया, अहमदाबाद
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती करत मोदी पंतप्रधान झाल्यास आपल्याला आनंदच होईल असं म्हटलंय. मोदींची स्तुती करुन अडवाणींनी आपली नाराजी दूर झाल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.
काल अहमदाबादमध्ये ` इन्स्टिट्युट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी, रिसर्च अँड मॅनेजमेंट` या संस्थेचं अडवाणी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी बोलताना अडवाणी यांनी मोदींच्या कामाची स्तुती केली. अडवानी आणि मोदी यांनी काल एकत्रपणे तीन कार्यक्रमांना हजेरी लावली. दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचा संदेश जनतेत जाईल, याची पुरेपूर काळजी भाजपनं घेतल्याचं बोललं जातंय.
उद्घाटन कार्यक्रमात बोलतांना अडवाणी म्हणाले, `नरेंद्रभाई सातत्यानं नाविन्यपूर्ण विचार करतात आणि तो राबवण्यासाठी नवनव्या मार्गानं पुढाकार घेतात`. शिवाय गुजरातमधील विकासकामांचं देशानंच नव्हे, तर जगानंही कौतुक केल्याचं ते म्हणाले.
या उद्घाटन कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त मोदी आणि अडवाणी सर्किट हाउसमध्ये सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीत सहभागी झाले होते. तर दुपारी अहमदाबाद महापालिकेनं साबरमती नदीकाठी उभारलेल्या दोन उद्यानांचा लोकार्पण सोहळा अडवाणींच्या हस्ते करण्यात आला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.