मुंबई : मंगळवारी रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करत एक असा निर्णय घेतला ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. पंतप्रधानांचा हा निर्णय अतिशय ऐतिहासिक आणि धाडसी होता. या निर्णयाचा परिणाम अगदी सर्वसामान्यांपासून ते उद्योगपती सर्वांवर पाहायला मिळाला.
पंतप्रधानांचा हा निर्णय एका दिवसात अचानक घेतला गेला होता का ? की आधीपासूनच यावर काम सुरु होतं याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि रात्री ८ नंतरच हा निर्णय का घेण्यात आला याची काही कारणं देखील सध्या सोशल मिडियावर फिरतायंत.
पंतप्रधानांचा हा निर्णय अचानक घेतलेला आहे असं म्हणता येणार नाही. तुमच्या बँक खात्यांशी तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि इतर माहिती आधी जोडली गेली. याचा फायदा सरकारला आता होणार आहे.
पंतप्रधानांनी याआधी ज्यांच्याकडे काळा पैसा होता आणि त्याची माहिती सरकारला दिली नव्हती त्यांना ती माहिती आणि टॅक्स भरण्यासाठी वेळ देण्यात आला.
आयकर विभागाला ही सर्व माहिती देण्यात आली. बँक खात्यावर देखील आता आयकर विभाग काही दिवस लक्ष ठेवून असणार आहे.
8 वाजताच ही घोषणा का करण्यात आली ?
सराफा बाजाराचा व्यवहार रात्री ८ च्या सुमारास जवळपास संपलेला असतो. त्यामुळे याचा शेअर बाजारावर परिणाम होणार नाही.
शेअर बाजार देखील रात्री आठ आधीच बंद होतो त्यामुळे खूप मोठा व्यवहार करण्याची संधी येथे मिळणार नाही.
अमेरिकन निवडणुकीवर खूप मोठा सट्टा लागला होता. हजारो कोटींचा सट्टा रात्री १ वाजता सुरु होणाऱ्या मतमोजणीवर लागला होता पण रात्री १२ नंतर तो ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्यात आल्याने त्याचा मोठा फटका सट्टेबाजांना बसला.
बँकांचे व्यवहार हे देखील रात्री बंद करण्यात आले आणि एटीएम सेवा देखील अनेक ठिकाणी संध्याकाळी ६ नंतरच बंद करण्यात आली. बँकांचे ऑनलाईन व्यवहार देखील संध्याकाळी बंद ठेवण्यात आली.
संध्याकाळी बँकेत जमा झालेल्या नोटांची माहिती ही देखील बँकेला त्याच्या सर्व्हरवर अपलोड करावी लागते. प्रत्येक नोटांची संख्या ही अपलो़ड केली जाते. त्यामुळे ही वेळ निघून गेल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. म्हणजेच बँक मॅनेजरने जर नोटा बदलण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला काहीही करता आलं नसतं.
अशा प्रकारे अनेक कारणांमुळे हा निर्णय ८ नंतर जाहीर करण्यात आला.