...आणि गोंधळलेल्या अमेरिकेचा चेहरा जगासमोर आला!

एका प्रश्नानं अमेरिकेला गोंधळात टाकलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुसलमान देशांवर बंदी जाहीर केल्यानंतर रद्द झालेल्या व्हिजांच्या संख्येवर अमेरिकेत गोंधळाचं वातावरण दिसतंय. 

Updated: Feb 4, 2017, 11:30 PM IST
...आणि गोंधळलेल्या अमेरिकेचा चेहरा जगासमोर आला! title=

वॉशिंग्टन : एका प्रश्नानं अमेरिकेला गोंधळात टाकलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुसलमान देशांवर बंदी जाहीर केल्यानंतर रद्द झालेल्या व्हिजांच्या संख्येवर अमेरिकेत गोंधळाचं वातावरण दिसतंय. 

सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टात सांगितलेला आकडा आणि परदेश मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यात कमालीची तफावत आढळलीय. 

शनिवारी ड्युल्स इंटरनॅशनल एअरपोर्टवर दाखल झालेल्या यमनच्या दोन भावांना आपला व्हिजा परत करावा लागला. यानंतर त्यांना इथोपियासाठी इथूनच विमानानं परत पाठवण्यात आलं. त्यांनतर या दोघांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरकारी वकील एलेक्सेंड्रिया यांनी कोर्टात बंदीनंतर 1,00,000 हून अधिक व्हिजा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं. याचिकाकर्त्यांचे वकील सिमॉन सँडोवाल मोशेबर्ग यांच्या म्हणण्यानुसार, एक लाख ही संख्या धक्कादायक आहे.  

तर दुसरीकडे परदेश मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, बंदीनंतर 60,000 व्हिजा रद्द करण्यात आलेत. व्हिजा कायमचा रद्द करणं हे त्रासदायक असलं तरी आम्ही आदेशाचं पालन करत असल्याचं परदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विल कॉक्स यांनी म्हटलंय. 

पण, यामुळे अमेरिकेतला आकड्यांचा गोंधळ मात्र स्पष्टपणे जगासमोर आला.