ओबामांच्या दौऱ्यानं भारताला हे मिळालं.. टॉप 12 मुद्दे!

अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात भारताच्या पदरी महत्त्वाच्या गोष्टी पडल्या आहेत. सहा वर्षापासून रखडलेला नागरी अणूऊर्जाचा मार्ग मोकळा झाला असला तरी तीन दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी या भेटीदरम्यान घडल्या आहेत. 

Updated: Jan 27, 2015, 05:44 PM IST
ओबामांच्या दौऱ्यानं भारताला हे मिळालं.. टॉप 12 मुद्दे! title=

नवी दिल्ली: अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात भारताच्या पदरी महत्त्वाच्या गोष्टी पडल्या आहेत. सहा वर्षापासून रखडलेला नागरी अणूऊर्जाचा मार्ग मोकळा झाला असला तरी तीन दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी या भेटीदरम्यान घडल्या आहेत. 

नमस्ते... म्हणत संपूर्ण भारतीयांचं मन जिंकणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही भारतीयांशी मनमोकळ्या गप्पा मारत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. ओबामा यांचं मोठ्या उत्साहात भारतीयांनी स्वागत केलं. दोन्ही देशातील संबंध सुधारण्यावरच भर देणार असल्याचं बराक ओबामा यांनी अखेरच्या भाषणातही सांगितलं. भारत मोठी बाजारपेठ असल्यामुळं या बाजारात आपला माल खपवण्याचा अनेक देश प्रयत्न करत आहेत. 

भारताच्या वाट्याला हे आलं-

1. नागरी आण्विक ऊर्जा मधील अडचणी दूर 

भारतातील आण्विक प्रकल्पावरील पर्यवेक्षण करण्याची अट काढून टाकली. नुकसान भरपाई आणि गुन्हे दाखल करण्यासंदर्भात तोडगा.  6 वर्षापासून रखडला होता अणूकरार. भारतातील 4 कंपन्या 750 कोटी रुपयांचा इंशोरंन्स देणार उर्वरित 750 कोटी रुपयांचा बोजा भारत सरकार उचलणार. 

2. संरक्षण तंत्रज्ञान (डिफेन्स टेक्नाँलजी) देण्याचं कबूल

एअरक्राफ्ट तंत्रज्ञानासंदर्भात करार झाला आहे. अमेरिका 17 उच्च तंत्रज्ञान असलेल्या वस्तू भारताला देणार आहे. त्यात मानव आणि शस्त्ररहित एअरक्राफ्ट असणार आहेत. त्याचबरोबर विमान उतरवण्याची प्रणाली भारताला मिळेल. 

3. 100 अरब डॉलरचे लक्ष्य
दोन्ही देशातील व्यापार 60 टक्क्यांनी वाढलेला आहे. मात्र, हा व्यापार 100 अरब डॉलर पर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य असणार आहे. त्यामुळे उत्पादन वाढविण्यासाठही सहकार्य घेतले जाणार आहे.

4. डिजिटल युग आणि व्यापार 
डिजिटल टेक्नॉलजी आणि अक्षय ऊर्जा यामध्ये अमेरिकेची भारताला मदत मिळणार आहे. तंत्रज्ञान विकास आणि उत्पादन यासाठी दोन्ही देशात 10 वर्षाचा करार झाला. 

5. तीन स्मार्ट सिटी बनवण्यात सहकार्य 
विशाखापट्टणम, अलाहाबाद आणि अजमेर येथे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी अमेरिकेचे सहकार्य घेणार. यात जागतिक दर्जाच्या सुविधा असतील 

6. गुप्तचर आणि समुद्री सुरक्षावर एकत्र 
दोन्ही देशातील गुप्तचर यंत्रणा एकमेकांना माहितीचे आदान-प्रदान करणार. त्याचबरोबर समुद्री सुरक्षासाठीही अमेरिका सहकार्य करणार 

7. ऊर्जा मध्ये मोठी गुंतवणूक करणार
स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा मिळणे आवश्यक आहे. दोन्ही देशांनी भागीदारी करण्यास सहमती दर्शवलीय. 

8. दहशतवादविरोधी भारताला सहकार्य 
दहशतवादाची झळ दोन्ही देशांना बसली आहे. त्यामुळे दहशतवाद विरोधात एकमेकांना सहकार्य करण्याचे आश्वासन या दौऱ्यातून मिळालं आहे. 

9. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थान 
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्य बनवण्याच्या दृष्टीने अमेरिका प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

10. गुंतवणूक 
भारतात एफडीआयच्या माध्यमातून गुंतवणूकीचे मार्ग मोकळे केले आहेत. 2000 ते 2014 पर्यंत अमेरिकेनं भारतात 13.8 अरब डॉलर एवढी गुंतवणूक केली आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात येणार आहे. 

11. निर्यात नियंत्रण व्यवस्थेत सदस्यत्व
आंतरराष्ट्रीय निर्यात नियंत्रण व्य़वस्था यामध्ये भारताला सदस्यतेसाठी समर्थन देण्यावर सहमती झाली आहे. 

12. कामगारांच्या हिताचा करार
अमेरिकेत काम करणारे 30 लाख भारतीय आहेत. त्यामुळे त्यांच्या सामाजिक सुरक्षा पुरवणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भातही सामंजस्य करार होणार आहे. 

महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांनी जगाला महत्त्वाच्या गोष्टी दिल्या असल्याचा उल्लेख बराक ओबामा केला. परंतू या भेटीत बराक ओबामा यांनी हैद्राबाद हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत युक्रेनमधील वादावर प्रकाश टाकलाय. भारतानं नेहमीच रशियाची बाजू घेतल्यामुळे ओबामा यांनी वेगळ्या भाषेत भारताला सुनावण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे चीननंही पाकिस्तान हा विश्वासलायक मित्र असल्याचे वक्तव्य केल्यामुळे ओबामा यांच्या भारतभेटीचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटत असल्याचे दिसून येत आहेत. 

ओबामा यांच्या भेटीमुळे भारताला अनेक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हीच संधी भारताला महासत्ता बनवण्यासाठी मदत करील. भारत-अमेरिकाचे मैत्रीचे धागे विणण्यास सुरूवात झाली आहे. हे धागे नाजूक असले तरी किती तग धरतात ते पाहावं लागणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.