क्वात्रोची, अँडरसनला पळून जाण्यात कुणी मदत केली? राहुलच्या आईला सुषमांचा प्रश्न

ललित मोदी आणि इतर प्रकरणांमुळे संसदेत अडचणीत आलेल्या सुषमा स्वराज यांनी आज पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी, त्या काँग्रेसची पोलखोल करत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना दिसल्या.

Updated: Aug 12, 2015, 03:53 PM IST
क्वात्रोची, अँडरसनला पळून जाण्यात कुणी मदत केली? राहुलच्या आईला सुषमांचा प्रश्न title=

नवी दिल्ली : ललित मोदी आणि इतर प्रकरणांमुळे संसदेत अडचणीत आलेल्या सुषमा स्वराज यांनी आज पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी, त्या काँग्रेसची पोलखोल करत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना दिसल्या.

बुधवारी, दुपारी संसदेत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्यानंतर, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ललित मोदी प्रकरणात कायदेशीर मदत घेता आली असती, असं म्हणत पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर हल्लाबोल केला. 

मी पुन्हा सांगतेय की मी काहीही चुकीचं केलेलं नाही. एका कँसर पीडित महिलेला मदत करण्यात काहीही गैर नाही, असा पुनरुच्चार सुषमांनी यावेळी केला.

माझे पती ललित मोदीचे पासपोर्ट केसमध्ये वकील नव्हते... माझ्या मुलीनंही ललित मोदीकडून एक रुपयाही घेतलेला नाही. गेल्या ३२ वर्षांपासून मी राजकारणात आहे, पण माझ्यावर आत्तापर्यंत कोणताही काळा डाग नाही.
 
सुषमा स्वराज या आपलं म्हणणं मांडत असतानाच विरोधकांनी संसद डोक्यावर उचलून धरल्यानं त्यांनी त्याच गोंधळात 'माझं म्हणणं ऐकल्याशिवाय मला न्याय कसा दिला जाऊ शकेल' अशी सादही खासदारांना घातली.

पी. चिदंबरम अर्थमंत्री होते तेव्हाही हितसंबंध जपले गेले होते. ते या पदावर असतानाच चिदंबरम त्यांची पत्नी नलिनी वकील होती. त्यावेळी त्यांनाही इन्कम टॅक्सचा वकील म्हणून नेमण्यात आलं होतं. खुद्द चिदंबरम यांनीही याची कबुली दिली होती. चिदंबरम यांच्या पत्नीनं शारदा घोटाळ्यात वकील म्हणून एक करोड रुपये फी म्हणून घेतले होते, असं म्हणत सुषमा यांनी काँग्रेसवरच पलटवार करण्याचा प्रयत्न केला. 

'कोणत्याही कोर्टानं ललित मोदी यांना फरार म्हणून घोषित केलेलं नाही. मी कोणतंही काम लपून-छपून केलेलं नाही' असंही त्यांनी म्हटलं.

मी चूक केलीय असं म्हणणाऱ्या राहुल यांनी अगोदर स्वत:च्या कुटुंबाचा इतिहास वाचावा... मी राहुल गांधींच्या आईला प्रश्न विचारतेय, क्वात्रोची आणि अँडरसनला पळून जाण्यात कुणी मदत केली? अँडरसनला पळून जाण्यासाठी मदत करणारे राजीव गांधी होते... क्वात्रोचीला जामीन काँग्रेसमुळे मिळाला... आणि तोही छुप्या पद्धतीनं... काळ्या गोष्टी अंधारात करणं ही गांधी घराण्याची रीतच आहे, असं उत्तर काँग्रेसच्या आरोपांना सुषमा स्वराज यांनी दिलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.