नवी दिल्ली : सुब्रमण्यम स्वामी भाजपाला डोईजड होतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे, कारण खुद्द मोदींनी फटकारल्यानंतरही सुब्रमण्यम स्वामी ऐकायला तयार नाहीत. उलट प्रसिद्धीच माझ्यामागे धावत असल्याचा दावा, सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
मोदींनी सुब्रमण्यम स्वामी यांचं नाव न घेता, रघुराम राजन यांच्यावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी करण्यात आलेली टीका अयोग्य असल्याचे सांगत स्वामींनी फटकारलं होतं.
तरीही 'माझ्या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांचा घोळका बातम्या मिळविण्यासाठी रेंगाळत असतो. त्यामुळे मला आपोआपच प्रसिद्धी मिळते, असे स्वामी यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. मी सदैव मोदींसारख्या कणखर पाठीशी उभा आहे. मात्र, मला भडकवण्यासाठी प्रसारमाध्यमांकडून जाणुनबुजून खोट्या बातम्या पेरल्या जातात, असं ही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
'प्रेस्टिट्यूट'कडून दररोज खोट्यानाट्या बातम्या दिल्या जातात. त्यांना वाटते की, मी संतप्त होऊन काही प्रतिक्रिया देईन राजकारण्याला प्रसिद्धी अकारण चिकटते, ही माझी नवीन समस्या आहे. आताही माझ्या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांचा घोळका उभा असल्याचंही स्वामी यांनी म्हटलं आहे.