श्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करणार

 श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असं समजतं.

PTI | Updated: Nov 12, 2014, 04:55 PM IST
श्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करणार  title=

नवी दिल्ली/कोलंबो:  श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असं समजतं.

कोलंबो हायकोर्टानं तामिळनाडूतील पाच आणि श्रीलंकेतील तीन अशा आठ मच्छिमारांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर श्रीलंकेतील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री प्रभा गणेशन यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांशी चर्चा केल्याचं वृत्त आहे. 'श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या पाचही मच्छिमारांना माफ करण्यास तयार असून लवकरच त्यांची सुटका केली जाईल' असं आश्वासन गणेशन यांनी भारतीय उच्चायुक्तांना दिल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. 

भारतानं श्रीलंकेतील सुप्रीम कोर्टात मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात दाखल केलेली याचिका मागं घ्यावी अन्यथा मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणखी काही महिन्याचा विलंब होईल अशी सूचनाही गणेशन यांनी उच्चायुक्तांना केली आहे. 

काय आहे हे प्रकरण?

२०११ मध्ये श्रीलंकेतील नौदलानं पाच भारतीय आणि श्रीलंकेतील तीन मच्छिमारांना अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडे हिरोईन हे अंमली पदार्थ आढळले होते असा दावा नौदलानं केला होता. कोलंबोतील उच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात या आठही जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.  मात्र कोलंबोतील या निर्णयाचे पडसाद थेट तामिळनाडूतील रामेश्वरम इथं दिसले. या मच्छिमारांच्या नातेवाईकांनी या निर्णयाविरोधात जोरदार विरोध प्रदर्शन केलं. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्या मच्छिरांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. श्रींलकेतील भारतीय दुतावासानं मच्छिमारांच्या सुटकेसाठी तेथील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि यासाठी श्रीलंकेतील ख्यातनाम वकिलाची नेमणूकही केली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.