तिरुवनंतपुरम : मॅच फिक्सिंगच्या आरोपात तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडलेला खेळाडू एस श्रीसंत आता राजकारणाची इनिंग खेळणार असल्याचं निश्चित झालंय. तिरुवनंतपुरममधून तो केरळ विधानसभेची निवडणूक लढवणार आहे.
पण, नुकताच त्याने काही गोष्टींचा उलगडा केलाय. आरोपांचा काळ आपल्यासाठी खूप कठीण होता. आपण पूर्णपणे हिंमत हरलो होतो. पण, या काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आपली पत्नी भुवनेश्वरी. तिनेच आपल्याला आत्मविश्वास मिळवून दिल्याचं श्रीसंतने सांगितलं.
मध्य प्रदेशमध्ये भुवनेश्वरीचे वडील हिरेंद्र सिंग शेखावत मोठे उद्योगपती आहेत. मध्य प्रदेश पर्यटन विकास मंडळाचे ते सदस्य आहेत. त्यांनीच श्रीसंतला भारतीय जनता पक्षात स्थान मिळवून दिलंय. श्रीसंतचे वडीलही केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. पण, सासऱ्यांच्या सांगण्यावरुन श्रीसंतने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं आहे.
येता मे महिना श्रीसंतसाठी खास असणार आहे. निवडणूक जिंकल्यास श्रीसंत पहिल्यांदा आमदार होणार आहे. मे महिन्यातच पहिल्यांदा ऋचा चड्ढासोबत तो 'कॅब्रे'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटातून तो पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय.