www.24taas.com, झी मीडिया, बंगळूर
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शपथ घेतली. ते राज्याचे २२ वे मुख्यमंत्री आहेत.
राज्यपाल एच. आर. भारद्वाज त्यांच्या उपस्थितीत सिद्धरामय्या यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी कांतीवीरा स्टेडियममध्ये सुमारे पन्नास हजार नागरिक उपस्थित होते. कर्नाटकमध्ये स्वच्छ सरकार स्थापन करणार असल्याचे, सिद्धरामय्या यांनी सांगितले.
विधानसभेच्या निवडणुकीत १२१ जागा जिंकत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर १० रोजी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सिद्धरामय्या यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या मंत्रिमंडळात डी. के. शिवकुमार, आर. व्ही. देशपांडे, शमनौर शिवशंकरप्पा आणि टी. बी. जयचंद्र यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन ते आठवडाभरात मंत्रिमंडळ स्थापन करण्याची शक्यता आहे. आजच सिद्धरामय्या हे दिल्लीला रवाना होणार असून, ते पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.