नवी दिल्ली: काँग्रेस नेते शशी थरूर यांची काँग्रेसच्या प्रवक्तापदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदींचं केलेलं कौतुक आणि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू यामुळं थरूर अडचणीत सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियानात ९ जणांना सहभागी करत त्यात शशी थरूर यांनाही स्थान दिलं होतं. थरूर यांनी ते निमंत्रण स्वीकारत मोदींनी आपली निवड करणं हा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र या घटनेवर केरळ काँग्रेसनं नाराजी दर्शवली होती. थरूर यांची मोदींवरील वक्तव्यं काँग्रेसच्या विचारसरणीच्या विरोधात असल्याचं पक्षाचे केरळमधील उपाध्यक्ष सूरनाद राजशेकरन यांनी सांगितलं होतं.
मोदींची स्तुती बंद करा अशी तंबीही त्यांना देण्यात आली होती. मात्र आपण हिंदुत्वाच्या अजेंडाच्या बाजूचे नसल्याचं सांगत मोदींबाबतची माझी वक्तव्यं राजकीय नव्हे तर व्यक्तिगत टिपण्णी आहेत, असं स्पष्टीकरण थरूर यांनी दिलं होतं.
तर जानेवारी महिन्यात थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सापडला होता. त्यांचा मृत्यू विषबाधेमुळं झाल्याचं नुकतंच समोर आलंय. या सर्व प्रकारांमुळं थरूर अडचणीत सापडले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.