दिल्ली : दिल्लीत 'आप'ने आपण धार्मिक राजकारणाला तिलांजली देत असल्याचं दर्शवत, शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा पाठिंबा नाकारलाय.
विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत असतानाच जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी आम आदमी पक्षाला जाहीर केलेला पाठिंबा 'आप'ने मात्र धुडाकावला आहे. आपच्या या 'चाली'ने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यातच मतदानाला काही तास उरले असताना या निवडणुकीला काहीसा धार्मिक रंग चढल्याने वातावरण अधिकच तापले आहे.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांनी दिल्लीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केल्यानंतर आज जामा मशिदीचे इमाम सय्यद अहमद बुखारी यांनीही 'आप'ला पाठिंबा जाहीर केला.
दिल्लीतील मतदारांनी विशेषत: मुस्लिमांनी आम आदमी पक्षाला मतदान करून एका धर्मनिरपेक्ष पक्षाला निवडून द्यावे, असे आवाहन बुखारी यांनी केले.
मतदानाला अवघे काही तास उरले असताना बुखारींनी केलेल्या या आवाहनावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागताच 'आप'ने अत्यंत सावध पवित्रा घेत तातडीने हा पाठिंबा धुडकावला.
'आप'ला धर्माच्या आधारावर राजकारण करायचे नाही, असे सांगत 'आप'ने बुखारींचा पाठिंबा घेण्यास नकार दिला.
बुखारी यांनी आपल्या मुलाच्या 'दस्तारबंदी' कार्यक्रमाला भारताच्या पंतप्रधानांना आमंत्रण न देता पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र पायघड्या घातल्या, अशा व्यक्तीचा आम्ही पाठिंबा घेऊ शकत नाही, असेही आपचे नेते संजय सिंह यांनी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.