नवी दिल्ली : काश्मीरमध्ये बुधवारी लष्कराच्या कुपवाड्यातल्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये तीन जवान शहीद झाले. पण आत्मघातकी हल्ल्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना जिवंत जाऊ देतील ते भारतीय जवान कसले. जागच्या जागीच दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश आलं आणि हे धैर्य दाखवणारा जवान सुदैवानं बचावला. जीवावर उदार होऊन मायभूची रक्षा करणाऱ्या ख-या बाहुबलीच्या शौर्याला सलाम.
ऋषी कुमार सध्या रुग्णालयात उपचार घेतोय.पण त्याची धैर्य असाधारण आहे. त्याचा पराक्रम अतुलनीय आहे. भल्या भल्यांना घाम फोडेल असा आहे. बुधवारी पहाटे ऋषी कुमारनं जे केलं त्याचा साऱ्या भारताला सार्थ अभिमान आहे.
ऋषी कुमारच्या शिरस्त्राणाला दहशतवाद्यांची गोळी लागली. तो खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या हातालाही गोळी लागली. पण भारतीय जवानांचा पराक्रम काय असतो हे त्यानं दहशतवाद्यांच्या गटाला दाखवून दिलं. दोघांना गोळ्या घालून ठार केलं. तिसरा कसाबसा जीव मुठीत घेऊन फरार झाला. तेव्हा सारा गाव झोपेतून खडबडून जागा झाला.
कुपवाड्यातल्या ऋषी कुमार सारखे बाहुबली या देशाच्या सीमा राखतायत म्हणून आपण सुखानं झोपू शकतोय. कुपवाड्याच्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे कॅप्टन दर्जाचे अधिकारी शहीद झाले. कारण झोपेत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पण अधिका-यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या ऋषी कुमारनं जे धाडस दाखवलं ते केवळ अतुलनीयच म्हणावं लागेल.
पाहा व्हिडिओ