'बलात्काऱ्यांना नपुंसक बनवा'; कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत आणि विरोध

अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवा, अशी अत्यंत जहाल सूचना मद्रास हायकोर्टानं केलीय तर दुसरीकडे मुलांवर अत्याचार करणारे पशू आहेत, असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढलेत... कोर्टाच्या या कठोर भूमिकेचं स्वागतही होतंय आणि विरोधही...

Updated: Oct 28, 2015, 10:36 AM IST
'बलात्काऱ्यांना नपुंसक बनवा'; कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत आणि विरोध  title=

मुंबई : अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवा, अशी अत्यंत जहाल सूचना मद्रास हायकोर्टानं केलीय तर दुसरीकडे मुलांवर अत्याचार करणारे पशू आहेत, असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढलेत... कोर्टाच्या या कठोर भूमिकेचं स्वागतही होतंय आणि विरोधही...

बलात्कार रोखण्यासाठी भारतातले कायदे अपुरे ठरत आहेत. लहान मुलांच्या बलात्काऱ्यांना नपुंसक बनवायला हवं त्यांचं लिंग बधीर किंवा निकामी करायला हवं... ही कठोर सूचना केलीय ती चक्क मद्रास हायकोर्टानं... कोवळ्या मुलांवर होणारे अमानुष बलात्कार रोखण्यासाठी कोर्टानं हा उपाय सुचवलाय.

निरागस मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना नपुंसक बनवायला हवं. अशा बलात्का-यांचं गुप्तांग बधीर करणं किंवा निकामी करणं हीच योग्य शिक्षा ठरेल. या शिक्षेवर बहुतेकजण सहमत नसतीलही. पण सध्याचे कायदे अपुरे पडत असल्यानं अशी कठोर शिक्षाच व्हायला हवी, अशी सूचना न्यायमूर्ती एन. किरूबकरन यांनी केलीय.

तर दुसरीकडं सुप्रीम कोर्टानंही अन्य एका बलात्कार प्रकरणात गंभीर ताशेरे ओढलेत. लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार करणारे नराधम पशूच आहेत. त्यांना अजिबात दयामाया दाखवता कामा नये, असे कोरडे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. अमितवा रॉय यांनी ओढलेत. 

कोर्टाच्या या सूचनांचं महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलंय तर दुसरीकडं काहींनी मात्र या सूचनांवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

गेल्या काही दिवसांत लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढल्यात.
2012 मध्ये 38,172
2013 मध्ये 58,224
2014 मध्ये 89,423

लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यात. या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर कठोर उपाययोजनांची गरज आहे, एवढं निश्चित... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.