मुंबई : रेल्वेच्या तात्काळ सेवेसाठी तुम्हाला आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. दलालांना थोपवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा दावा रेल्वेने केला असला, तरी या उपाययोजनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते.
रेल्वेस तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महसूलवाढीसाठी पुन्हा एकदा प्रीमियम सेवेचा आग्रह धरताना तत्काळ सेवेस वेठीस धरले आहे.
ऐनवेळी प्रवासासाठी महत्त्वाची सुविधा ठरलेल्या तत्काळ कोट्यातील ५० टक्के तिकिटांसाठी प्रीमियम सेवेप्रमाणे दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
३ ऑक्टोबरपासून काही एक्स्प्रेस गाड्यांच्या तत्काळ कोट्यातील ५० टक्के तिकिटांसाठी हे अव्वाच्या सव्वा दर आकारणे सुरू होईल. दलालांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा रेल्वेने केला आहे. मात्र, त्यामुळे प्रवाशांवर जादा आर्थिक भार सहन पडणार आहे.
मेल, एक्स्प्रेसची तिकिटे फुल्ल झाल्यानंतर शेकडो प्रवाशांना तत्काळ कोट्यातील तिकिटांचा आधार मिळतो.
मात्र, रेल्वे मंत्रालयाने नेमक्या याच कोट्यावर लक्ष ठेवून त्यातून जास्तीत जास्त महसूल मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठीच तत्काळमधील ५० टक्के तिकिटांसाठी विमानसेवेप्रमाणे मागणी-पुरवठानुसार जादा दर आकारण्याचा मार्ग खुला केला आहे.
या निर्णयानुसार काही ठराविक गाड्यांच्या तत्काळ कोट्यातील ५० टक्के तिकिटांची विक्री याप्रकारे होणार आहे.
रेल्वेने प्रीमियम सेवेची अंमलबजावणी अनेक मार्गांवर केली आहे. त्यातून रेल्वेस चांगलाच महसूल मिळत आहे. त्याचाच कित्ता गिरवत रेल्वेने तत्काळ सेवेवर त्याची अंमलबजावणी केली आहे. नेमक्या दिवाळीच्या आधीच तत्काळ तिकिटांना लक्ष्य केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.