नवी दिल्ली : पंजाबमधील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराला अकाली दलाचे सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या धरणे आंदोलन कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले. तेव्हा काँग्रेस पक्ष अंमली पदार्थांच्या विळख्यातून राज्याला मुक्त करेल आणि अंमली पदार्थांच्या तस्कऱ्यांनी जो पैसा मिळविला जातो तो पीडितांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल, असेही गांधींनी आश्वासन दिले.
अंमली पदार्थांची होणारी तस्करी उडता पंबाजमधून लोकांसमोर येऊ नये म्हणून उडता पंजाब या चित्रपटावर बंदी घालण्याचा अकाली दलाचा प्रयत्न होता असाही आरोप त्यांनी केला. अंमली पदार्थाच्या व्यापारातून लाभ होत असल्याचे मान्य करण्यास अकाली दल मात्र तयार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. अंमली पदार्थांच्या तस्करीतून ज्यांनी इमले बांधले त्यांच्याकडून हा पैसा परत घेऊन तो पीडितांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल.
निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर आले तर अंमली पदार्थविरोधी कायदा करण्यात येईल आणि पोलिसांना योग्य प्रकारे तैनात केले जाईल, असेही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बोलले.