www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
काँग्रेसचे युवा नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानावर भाजपनं तीव्र शब्दांत टीका केली आहे. हे काँग्रेस नव्हे, नौटंकी सरकार असल्याचा टोमणा भाजप प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे.
राहुल गांधी यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. दोषी लोकप्रतिनिधींना पुन्हा निवडणूक लढवण्याच्या वटहुकमाला राहुल गांधींनीही विरोध केलाय. भ्रष्ट नेत्यांबाबत तडजोड करु नका, डागाळलेल्या मंत्र्यांना वाचवणारा अध्यादेश फाडून फेकून द्या, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. यावर भाजपने ही टीका केली.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकारण्यांना संरक्षण देणारा अध्यादेश बकवास असल्याचं सांगून तो फाडून टाकला पाहिजे,असे मत राहुल गांधींनी व्यक्त करीत संताप व्यक्त केला. ही आमच्या सरकारनं केलेली चूक आहे. अशा शब्दात राहुल गांधी यांनी सरकारला फटकारलंय.
दरम्यान, काँग्रेस पक्षाकडूनही यावर प्रतिक्रीया देण्यात आली आहे. राहुल गांधी यांची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका असल्याचं पक्षाचे नेते अजय माकन यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत राहूल गांधी यांनी अचानकपणे प्रेस क्लबला भेट दिली. यावेळी त्यांच्या बरोबर अजय माकन होते. मात्र काँग्रेसच्या युवराजांची ही प्रतिक्रीया म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची प्रतिक्रीया उमटतेय. यावर भाजपनेही टीका केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.