लंडन : इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स विल्यम्स आणि त्यांच्या पत्नी केट मिडल्टन एप्रिल महिन्यात चार दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. या आधी त्यांच्या आई प्रिन्सेस डायना २४ वर्षांपूर्वी भारतात आल्या होत्या. १० एप्रिल रोजी भारतात येऊन १४ तारखेला ते भूतानला प्रस्थान करतील.
या भारत भेटीदरम्यान ते ताज महाल आणि आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्याला भेट देतील. त्यांच्या कारकीर्दीतील त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. भूतानमध्ये ते भूतानचे राजा, राणी आणि त्यांचे तीन आठवड्यांपूर्वी जन्मलेले राजपूत्र यांची भेट घेणार आहेत.
केन्सिंग्टन पॅलेसच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार विल्यम्स आणि केट त्यांचा राजपूत्र जॉर्ज आणि राजकन्या शॅरलेट यांना या दौऱ्यावर आणणार नाहीत. भारत आणि भूतान या दोन राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी हा दौरा आखला आहे.
भारताच्या इतिहासाप्रति ते आपले आदरभाव या दौऱ्यादरम्यान व्यक्त करतील. पण, २१व्या शतकात भारतातील तरुण काय करू इच्छितात, त्यांच्या आशा आकांक्षा काय आहेत याविषयी जाणून घेण्यास या दाम्पत्याला जास्त उत्सुकता आहे.
भारतातील आजचे नागरी जीवन, ग्रामीण जीवन, ग्रामीण भागांतील कला, भारतातील खेळ, उद्योजक मंडळी, शहरी भागात असलेला गरिबी हटवण्याचे प्रयत्न या सर्व बाबींचा ते अभ्यास करणार आहेत. मुंबईपासून त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात होईल आणि नंतर ते नवी दिल्लीकडे प्रस्थान करतील