मोदींनी परदेशात भारताचा आदर्श ठेवावा : काँग्रेस

परदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची प्रतिमा मलिन करीत आहेत. त्यांनी दौऱ्यात बोलताना भान ठेवावे. जगापुढे योग्य आचरण ठेवताना पंतप्रधानांना साजेशी विधाने करावीत, अशी टीका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी राज्यसभेत केली. 

PTI | Updated: Apr 29, 2015, 12:01 PM IST
मोदींनी परदेशात भारताचा आदर्श ठेवावा : काँग्रेस title=

नवी दिल्ली : परदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची प्रतिमा मलिन करीत आहेत. त्यांनी दौऱ्यात बोलताना भान ठेवावे. जगापुढे योग्य आचरण ठेवताना पंतप्रधानांना साजेशी विधाने करावीत, अशी टीका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी राज्यसभेत केली. 

मोदी पदेशात भाजपचे नेते म्हणून नव्हे, तर देशाचे पंतप्रधान म्हणून जातात. हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, असा मुद्दा राज्यसभेत शून्य प्रहरादरम्यान काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्य होण्यासाठी यापूर्वी भारत भीक मागत होता. आता मागणार नाही, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी जर्मनीमध्ये केले.  त्याचा शर्मा यांनी समाचार घेतला. भारताने कधी कोणापुढे हात पसरले नाहीत, असे शर्मा म्हणाले. 

भारत आधी स्कॅम इंडिया होता, आता स्कील इंडिया होईल. तसेच भारतात साठ वर्षांची घाण सोडून गेले ती साफ करायची आहे, अशीही वादग्रस्त विधाने मोदी यांनी कॅनडा दौऱ्यावर असताना केली. मोदी हे भाजपचे नेते आणि प्रचारक म्हणून परदेश दौरे करीत आहेत, असाही आरोप शर्मा यांनी केला. 

काँग्रेस सरकारने मोठी अर्थव्यवस्था मागे सोडली आहे. भारत अणुशक्ती, अंतराळ शक्ती बनला आहे. आम्ही चंद्र आणि मंगळावर पोहोचलो आहोत; पण मोदी यांनी सर्वच पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप शर्मा यांनी केला. 

त्यानंतर शरद यादव, मायावती, सुखेंदू शेखर राय, तपनकुमार राय आणि विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आदी नेत्यांनी शर्मा यांचे जोरदार समर्थन करीत पंतप्रधानांनी सभागृहात येऊन स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. 

दरम्यान, मोदी यांचा बचाव सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनी केला. १९७५च्या काळात समाजवादी नेते देशातील मानवाधिकाराच्या उल्लंघनाविरुद्ध जगभर प्रचार करीत फिरत होते, याचे स्मरण करून दिले. शरद यादव आणि अन्य समाजवादी नेत्यांवर डाव उलटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गदारोळामुळे सभागृह तीनवेळा तहकूब झाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.