नवी दिल्ली : पोरबंदरजवळ पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी बोटीचं गूढ वाढलंय. तब्बल ६०० कोटींचं ड्रग या बोटीतून पकडण्यात आलंय. बोटीतले सर्व आठही तस्कर कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहेत. मात्र या बोटीचं दाऊद कनेक्शन असल्याचा गुप्तहेरांचा संशय आहे.
पोरबंदरजवळ खोल समुद्रात नेव्ही, कोस्ट गार्डची धडाकेबाज कारवाई झाली. ६०० कोटींचं ड्रग्ज बोटीतून जप्त करण्यात आले. कारवाईत पाकिस्तानी स्मगलर्स पकडले. एवढ्या मोठ्या तस्करीशी डी कंपनी संबंधित?, असल्याचा संशय आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विविध भागात पाकिस्तानच्या कराची बंदरातून निघालेल्या बोटीतून ड्रग्ज येणार होती, अशी टीप गुप्तहेर संस्थांना मिळाली होती. त्यानंतर ही टीप नेव्ही आणि कोस्टगार्डशी शेअर करण्यात आली. त्यानुसार कोस्टगार्ड आणि नेव्ही डोळ्यात तेल घालून पश्चिम किनारपट्टीवर पाहारा करत होती. नेव्हीच्या निर्घट, कोंडूल या जहाजांसोबतच कोस्टगार्डचं संग्राम हे गस्ती जहाज किनारपट्टीचा परिसर पिंजून काढत होतं. अखेर कोस्टगार्डच्या संग्राम या जहाजाने पोरबंदरपासून १५० नॉटीकल माईल्सवर या पाकिस्तानी बोटीवर धडक कारवाई केली.
या कारवाईत ६०० कोटींचे अंमली पदार्थ, सॅटेलाईट फोन्स, ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम इत्यादी माल पकडण्यात आला. मात्र ही बोट पाठवली कोणी हा खरा सवाल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या तस्करीमागे दाऊद इब्राहीमचा हात आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात दाऊदचं नेटवर्क अजुनही कार्यरत आहे.
त्यामुळे भारतात अंमली पदार्थांच्या या तस्करीची जबाबदारी दाऊदवर सोपवण्यात आल्याचा संशय गुप्तहेरांना आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.. अंमली पदार्थांची तस्करी हा डी कंपनीचा सर्वात मोठा धंदा समजला जातो.. त्यामुळे या प्रकरणातही दाऊदचा हात असल्याचा मोठा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.