नवी दिल्ली : ललित मोदी आणि विजय माल्या यांच्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम भारत सोडून लंडनमध्ये निघून गेला आहे. भ्रष्टाचार आणि लाच मागण्याच्या आरोपाखाली सीबीआय कार्तीची चौकशी करत आहे. पण कार्ती आता लंडनमध्ये निघून गेल्याची माहिती समोर येते आहे.
कार्ती लंडनला निघून गेल्याची माहिती समोर येताच प्रवर्तन निर्देशालय (ED) ने त्याच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरु केली आहे. अटक होऊ नये म्हणून कार्ती चिदंबरम हा लंडनमध्ये निघून गेल्याचं बोललं जातंय. वरिष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे की, कार्तीचा लंडन दौरा आधीपासून निश्चित होता. काही दिवसात तो भारतात पुन्हा येईल. त्याच्या परदेश दौऱ्यावर कोणतीही बंदी नाही आहे .
मंगळवारी सीबीआयने चार शहरांमधील कार्ती चिदंबरमच्या घरांवर छापे टाकले होते. ही छापेमारी INX मीडियाला दिलेल्या मंजूरीमुळे केली गेली होती. कार्तीवर पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांची कंपनी INX मीडियाला टॅक्सच्या बाबतीत चौकशी होऊ नये म्हणून लाच घेतल्याचा आरोप आहे. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी यांच्यावर शीना बोरा हत्याकांडाचा देखील आरोप आहे.
कार्ती चिदंबरमने हे आरोप फेटाळले आहेत. सीबीआयने कार्ती चिदंबरम, पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी विरोधात विविध आरोप निश्चित करत एफआयआर दाखल केली आहे.