याकूबच्या फाशीवरून राजकारण, खासदार माजिद मेमन यांचा फाशीला विरोध

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतलाय. 

Updated: Jul 15, 2015, 02:56 PM IST
याकूबच्या फाशीवरून राजकारण, खासदार माजिद मेमन यांचा फाशीला विरोध  title=

नवी दिल्ली: मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतलाय. 

दरम्यान, याकूबच्या संभाव्य फाशीवरून राजकारणही जोरात आहे. १९९३च्या खटल्यात बचावपक्षाचे वकील असलेले राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी याकुबला फाशी देण्यास विरोध केलाय. याकुबची पुनर्विचार याचिका न्यायालयात प्रलंबित असताना त्याच्या फाशीची तारीख निश्चित करणं गैर असल्याचं मेमन म्हणाले. तर भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलंय.

१९९३ स्फोटाच्या खटल्यातले विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी सरकारच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केलंय.  

याकूबचा या स्फोटांशी काय संबंध होता पाहा

२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सुमारे २५० जणांचा मृत्यू झाला होता, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते. याकूब स्फोटाचा मास्टरमाईंड होता. व्यवसायानं चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या मेमनला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी १९९४ मध्ये अटक झाली होती.

२००७मध्ये टाडा न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. याकूबवर भारतीय दंड कलम १२० ब नुसार बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा त्याच्यावर आरोप होता. हल्ल्याचा कट रचणे, हल्ला करणे, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे यांसह विविध गुन्ह्यांतर्गत आरोप दाखल करण्यात आले. त्यानंतर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टाडा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.
न्यायालयाच्या या निर्णयावर मेमन याने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका दाखल केली होती. अखेर राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळून लावत मेननची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

याकूबला नागपूर जेलमध्ये देणार फाशी?

दरम्यान, याकूबच्या फाशीबाबत आपल्याला काही माहित नसल्याचं नागपूर जेलचे अधीक्षक योगेश देसाई यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितलंय. याबाबत सरकारच काय ते सांगू शकेल, असं त्यांचं म्हणणं आहे... दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर स्पष्ट बोलण्यास नकार दिलाय... सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार योग्य आहे ते केलं जाईल, इतकंच फडणवीस म्हणालेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.