www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली/मुंबई
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर तातडीनं बैठक घेतली. पंतप्रधानांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांच्याशीही फोनवर चर्चा केली आणि नक्षलवाद्यांना शोधून काढण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश दिलेत. नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी अतिरिक्त बलाची गरज असल्यास तीही पाठवण्याची तयारी दाखवली. केंद्रीय गृह मंत्रालयानं नक्षलविरोधी अभियानासाठी सैनिकांची एक तुकडी छत्तीसगडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलाय.
छत्तीसगडमध्ये परिवर्तन रॅलीवर झालेल्या नक्षली हल्ल्याचा काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी निषेध केलाय. हा हल्ला म्हणजे लोकशाही मूल्ल्यांवर हल्ला असल्याची प्रतिक्रिया सोनिया यांनी दिलीय. या हल्ल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली. तसंच पंतप्रधानांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याशी चर्चा केली.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातलाय. काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केलाय. छत्तीसगडच्या सुकमाजवळ ही घटना घडलीय. या हल्ल्यात काँग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांना गोळी लागलीय. पाठीत तीन गोळ्या लागल्यानं शुक्ल गंभीर जखमी झालेत तर काँग्रेस नेते महेंद्र कर्मा यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याचं पीटीआयनं म्हटलंय महेंद्र कर्मा हे माजी विरोधी पक्षनेते होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाचं नक्षलींनी अपहरण केलंय. या हल्ल्यात नक्षलींनी बंदुका आणि बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर केलाय. या हल्ल्यात काही जवान शहीद झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सुमारे हजार नक्षलींनी हा हल्ला केलाय. या हल्ल्यानंतर काँग्रेसनं परिवर्तन यात्रा तर भाजपनं विकासयात्रा रद्द केलीय.
दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्याचा निषेध केलाय. छत्तीसगडमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत अलर्ट जारी करण्यात आलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.