महाराष्ट्र 'भाजप'ला स्वबळावर लढावं लागणार

लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 33 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे आज निकाल हाती येणार आहेत. या निकालाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारची चाचणी परीक्षा म्हणून पाहिलं जात आहे. 

Updated: Sep 16, 2014, 05:40 PM IST
 महाराष्ट्र 'भाजप'ला स्वबळावर लढावं लागणार title=

नवी दिल्ली : मी मुख्यमंत्री होणार, गृहमंत्री मीच होणार अशा वल्गना भाजप नेत्यांनी जाहीर सभेत सुरू केल्यानंतर, देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत मोदींची जादू ओसरल्याचं चित्र आहे, त्यामुळे शिवसेनेशी वाटाघाटी होईल तेव्हा होईल, पण महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना स्वबळावर म्हणजेच स्वत:च्या कामगिरीवर लढण्याची वेळ आली आहे.

भाजपच्या काही राष्ट्रीय नेत्यांनीही वेळोवेळी लोकसभेत झालं तसं होईल, यावर विसंबून राहू नका असा इशारा यापूर्वीच देऊन ठेवला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना आता मोदींपेक्षा स्व:तच्या कामगिरीची जादू दाखवावी लागणार आहे.

विधानसभेच्या ३३ पोटनिवडणुकीच्या जागांचे निकाल लागले आहेत, हा निकाल भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे, कारण या पोटनिवडणुकींकडे मोदी सरकारची तिमाई परीक्षा म्हणून पाहिलं जात होतं, तसेच महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्वाचा मानला जातोय.

गुजरात आणि राजस्थानमध्ये लोकसभेत शंभर टक्के जागा जिंकणाऱ्या भाजपला या दोन्ही राज्यात धक्का बसला आहे, यासह उत्तर प्रदेशातही समाजवादी पार्टीने मुसंडी मारल्याने, मोदी नावाची लाट ओसरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उत्तरप्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने ११ पैकी ३ जागा जिंकल्या आहेत, तर समाजवादी पार्टीने ८ जागांवर विजय मिळवला आहे. गुजरात विधानसभेत भाजपने ६ तर काँग्रेसने ३ जागांवर विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये भाजप काँग्रेसला क्लीन स्वीप करण्यास अयशस्वी ठरली आहे.

राजस्थानातही लोकसभेत भाजपने शंभर टक्के जागा जिंकल्या होत्या, मात्र विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने १ तर काँग्रेसने ३ जागा जिंकल्या आहेत.

****************************************

अपडेट दुपारी 12.40  

- पोटनिवडणूक निकाल, उत्तरप्रदेशमध्ये भाजपला धक्का, ठाकूरद्वार, बल्हा आणि चरखारी या तीन जागांवर समाजवादी पक्षाला विजय

*************

अपडेट सकाळी 11.50 -

पोटनिवडणूक निकाल: गुजरात विधानसभेच्या सहा जागांवर भाजप तर दोन जागांवर काँग्रेस विजयी.

*************
अपडेट सकाळी 11.40  -

पश्चिम बंगालमध्ये बसीरहाट मतदारसंघात तसेच राजस्थानमधील कोटा दक्षिण येथे भाजप उमेदवार विजयी.

*************
अपडेट सकाळी 11.20-

रॉबर्ट वडरा यांच्या आर्थिक व्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली.

*************
अपडेट सकाळी 11.10 -

पोटनिवडणूक निकाल: बडोदा येथे भाजप उमेदवार रंजन बेन भट्ट विजयी

*************
अपडेट सकाळी 10.45 -

उत्तर प्रदेशमधील ११ जागांपैकी ९ जागांवर समाजवादी पक्ष तर २ जागांवर भाजपाची आघाडी.

*************
अपडेट सकाळी 10.41 -

राजस्थानमधील चारपैकी ३ जागांवर काँग्रेस आघाडीवर.

*************

अपडेट सकाळी 10.36 -

गुजरातमध्ये भाजपला धक्का, काँग्रेसला २ जागांवर विजय. रबारी गोवाबाई देसा येथून तर वजा बाबूभाई मंगरोल येथून विजयी.

अपडेट सकाळी 10.30

राजस्थान आणि उत्तर प्रदेशात मोदी लाटेचा प्रभाव कमी होतांना दिसतोय, पोटनिवडणुकीत भाजप पिछाड़ीवर जातांना दिसतंय.

राजस्थान आणि गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही. मात्र आता राजस्थान आणि गुजरातमध्ये भाजप पिछाडीवर जातंय.

आज ३३ जागांच्या पोटनिवडणुकींची मतमोजणी शेवटच्या टप्प्यावर आहेत. गुजरातमध्ये ९ पैकी ६ जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेसने ३ जागांवर आघाडी घेतलीय.

राजस्थानमध्ये ४ पैकी ३ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे, तर एका जागेवर भाजपची आघाडी आहे.

उत्तर प्रदेशात ११ जागांपैकी ९ जागांवर समाजवादी पार्टी आघाडीवर आहे, तर भाजपने २ जागांवर आघाडी घेतली, काँग्रेसला मात्र यूपीत अजूनही भोपळाचं आहे.

आसाममध्ये काँग्रेस आणि भाजपला स्थान मिळालेलं नाही.

*************

अपडेट सकाळी 10.10 - गुजरातमध्ये भाजपा ५ जागांवर तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर.
अपडेट सकाळी 10.10 - १३ दिवसांनतर पूरग्रस्त जम्मू-काश्मिरमधील जम्मू -श्रीनगर हायवे झाला सुरू.
अपडेट सकाळी 09.40  - त्रिपुरा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सुरूवात.
अपडेट सकाळी 09.30- उत्तर प्रदेश पोटनिवडणूक: सहारणपूरमधून सपाचे उमेदवार संजय गर्ग ७ हजार मतांनी आघाडीवर
*************
सकाळचे अपडेट 8.30 
मोदी सरकारच्या चाचणी परीक्षेचा आज निकाल

लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 33 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे आज निकाल हाती येणार आहेत. या निकालाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारची चाचणी परीक्षा म्हणून पाहिलं जात आहे. 

महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी ही चाचणी परीक्षा महत्वाची मानली जातेय.

विधानसभेच्या ३३ जागांमधून उत्तर प्रदेशात ११, गुजरातमध्ये ९, राजस्थानमध्ये ४, पश्चिम बंगालमध्ये २, पूर्वोत्तर राज्यांमध्ये ५ आणि छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातील एक-एक जागेचा समावेश आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.