www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नेमले गेले आहेत. हेच नरेंद्र मोदी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री बनले आहेत. पण मोदींना आपल्या आयुष्यात हालाखीचे दिवसही पाहावे लागले होते. एके काळी त्यांना कपडे धुणं आणि झाडू मारणं यांसारखी कामं करावी लागली होती. एक चहावाला म्हणून उपजिवीका करणारे नरेंद्र मोदी आज आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न स्टेट म्हणून देशात ओळखले जातात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नरेंद्र मोदी बालपणी प्रचारकांना चहा नाश्ता पोहोचवण्याचं काम करत. तेथील ८-९ खोल्यांमध्ये झाडू मारणं, प्रचारकांचे कपडे धुणं यांसारखी कामं ते करत. मात्र त्यामुळे रा.स्व.सं. शी त्यांची निष्ठा वाढू लागली. लहानपणीच त्यांनी राष्ट्रकार्याची शपथ घेतली होती. गुजरातमध्ये संघाच्या शाखा वाढवण्याच्या कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. वयाच्या अठराव्या वर्षी नरेंद्र मोदी घर सोडून निघून गेले होते.
पुढील दोन वर्षं ते कुठे होते, हे अजूनही एक गूढ आहे. कुणालाच हे निश्चित माहित नाही, की नरेंद्र मोदी या दोन वर्षांत कुठे होते व काय करत होते. दोन वर्षांनी जेव्हा ते घरी परतले, तेव्हा घरच्यांशी त्यांचे वाद होऊ लागले. तेव्हा पुन्हा घर सोडून मोदी अहमदाबादला गेले. तिथे आपल्या काकांच्या चहाच्या ठेल्यावर काम करू लागले. अहमदाबाद येथील गीता मंदीर येथे चहा विकण्यासाठी मोदी जाऊ लागले. तेथे संघाचे प्रचारक चहा पिण्यासाठी येत. त्यांचं बोलणं मोदी लक्षपूर्वक ऐकत. एकदा मोदींच्या बोलण्याने प्रभावित होऊन प्रचारकांनी राज्य मुख्यालयात असिस्टंट म्हणून काम करण्यासाठी बोलावलं. तेथून त्यांची घोडदौड सुरू झाली. आणि आज ते पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जात आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.