आणंद : ‘नवरात्री’बद्दल आक्षेपजनक वक्तव्य करून एका समुदायाचा रोष ओढावून घेणाऱ्या वादग्रस्त इमामांना एक जोरदार कानाखाली बसलीय.
धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या मेहंदी हसन यांना न्यायालयात घेऊन जात असताना ही घटना घडलीय. यावेळी, अचानक समोरून आलेल्या तरुणानं हसन यांच्या कानाखाली सणसणीत ठेऊन दिली.
'गरबा म्हणजे राक्षसांच्या मनोरंजनाचं साधन' असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं हसन चर्चेत आले होते.
एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हसन यांना जिल्ह्यातील थासरामध्ये मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यासाठी घेऊन जात होते. याचवेळी, अचानाक राकेश नावाच्या एका व्यक्तीनं आज मेहदी हसन यांना थप्पड लगावली. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब या तरुणाला ताब्यात घेतलं.
न्यायालयासमोर हजर करण्यात आलेल्या हसन यांना धार्मिक भावना दुखावल्याबद्दल न्यायमूर्ती पी. व्ही. भट्ट यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. महत्त्वाचं म्हणजे, हसन यांनी आपल्या बचावासाठी कोणत्याही वकिलाची नियुक्ती करण्यास नकार दिला होता. याशिवाय त्यांनी जामीन घेण्यासाठीही नकार दिला होता.
गुजरातचे इमाम हसन याआधीही चर्चेत आले होते... जेव्हा 2011 मध्ये सदभावना व्रतादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांनी एक गोल टोपी भेट म्हणून सादर केली होती. पण, ही टोपी घालण्यास नरेंद्र मोदींनी नकार दिला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.