आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होतेय. उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाचे पडसाद आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 5, 2013, 09:41 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होतेय. उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाचे पडसाद आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेसला कोंडीत पकडत सोनिया गांधी यांच्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा समाजवादी पक्षाच्या नेत्यानं दिल्यानं पावसाळी अधिवेशनाची सुरवात वादळी होण्याची चिन्हं आहेत.
१६ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात ४४ महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. तसंच अन्नसुरक्षा हे सोनिया गांधींचं लाडकं विधेयक संमत करणं हीच सरकारची प्राथमिकता असेल. विरोधकांनी सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत केलं होतं. मात्र पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही सरकारची कोंडी करण्यास विरोधक सज्ज असतील, असं चित्र आहे.

संसदेच्या अधिवेशनातली रणनिती ठरवण्यासाठी भाजपच्या संसदीय पक्षाची लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. सुचवलेल्या बदलांसह अन्नसुरक्षा विधेयक आणल्यास त्याला पाठींबा देण्याचा निर्णय भाजपनं जाहीर केलाय. तर तेलंगणा राज्य निर्मितीचा प्रस्ताव आणल्यास त्यालाही पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय. सद्य परिस्थितीमध्ये सरकारला घेरण्यासाठी अनेक मुद्दे भाजपकडे आहेत. त्यामुळं या अधिवेशनात भाजप विरुद्ध सरकार असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.