www.24taas.com, झी मीडिया, सागर
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी हे मीडियाच्या जीवावर मोठे झालेले नेते आहेत. त्यांनी कुठलंही मोठं कार्य केलेलं नाही’, असा आरोप दिग्विजय सिंगांनी मोदींवर केला आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसंच गीतकार विमहामेधाल भआई पटेल यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यासाठी दिग्विजय सिंग यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र यावेळी बोलताना नरेंद्र मोदींकडे आपला मोर्चा वळवत नरेंद्र मोदींना मीडियाने मोठं केलं आहे, असा अरोप त्यांनी केला. नरेंद्र मोदींनी कुठलंही मोठं काम केलं नाही, तरीही मीडिया त्यांचं गुणगान गात असतं, असं सिंग म्हणाले.
याशिवाय गुजरातमधील भ्रष्टाचारावर दिग्विजय सिंग यांनी टीका केली. गुजरातमध्ये मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्री तसंच भ्रष्टाचारी बाबूंबद्दल तक्रार करणंही अशक्य झालं आहे. २००२ सालापासून तेथे लोकायुक्त नियुक्त केला गेला नाही, असा आरोप दिग्विजय सिंग यांनी केला आहे. बीसीसीआयमधील भ्रष्टाचाराबद्दल मोदी काहीच का बोलले नाहीत, असा सवाल सिंग यांनी केला.
गुजरातमध्ये हजारो कोटींचे घोटाळे झाल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे, त्यावर मोदींनी काहीच उत्तर दिलेलं नाही, असं दिग्विजय सिंग म्हणाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे मोदींना तिकिट मिळण्याबद्दल विचारलं असता, दिग्विजय सिंग यांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.