'सुशासन दिनी' वाजपेयींना मिळणार 'भारतरत्ना'चं गिफ्ट?

यंदाच्या वर्षी 'भारतरत्न' पुरस्कारासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय. 

Updated: Dec 10, 2014, 10:44 AM IST
'सुशासन दिनी' वाजपेयींना मिळणार 'भारतरत्ना'चं गिफ्ट? title=

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी 'भारतरत्न' पुरस्कारासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय. 

येत्या २५ डिसेंबर रोजी वाजपेयींचा ९०वा वाढदिवस आहे. हा दिवस भाजप सरकार 'सुशासन दिन' म्हणून साजरा करणार आहे... त्याचदिवशी भारतरत्न पुरस्काराची घोषणा करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार त्यांना 'बर्थ डे गिफ्ट' देणार असल्याची चर्चा राजधानी दिल्लीत आहे. भाजपच्या अनेक खासदारांनी वाजपेयींना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी मोदी सरकारकडे केलीय.

आत्तापर्यंत भारतातील अनेक दिग्गजांना आणि काही काही पंतप्रधानांनाही भारतरत्नने गौरवण्यात आलंय. त्यात आता अटल बिहारी वाजपेयींच्या नावाचाही समावेश होण्याची शक्यता निर्माण झालीय.  भाजपच्या नव्या खासदारांच्या बैठकीत हा मुद्दा पहिल्यांदा पुढे आला. त्यानंतर दोनदा निवडून आलेल्या खासदारांनीही तीच मागणी केली. एवढे पुरेसे नव्हते म्हणून पक्षातल्या सगळ्या वरिष्ठ खासदारांनीही वाजपेयींना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी केली. भाजपच्या स्थापनेत वाजपेयींची प्रमुख भूमिका राहिली आहे. त्यामुळे पूर्ण बहुमातचे सरकार सत्तेत असताना वाजपेयींचा यथोचित सन्मान व्हावा, अशी खासदारांची इच्छा आहे.

सरकारमधील सर्व मंत्री सुशासनाच्या मुद्यावरुन वेळोवेळी अटल बिहारी यांच्या नावाचा उल्लेख करतात. त्यामुळे सुशासनाचा चेहरा ठरलेल्या  वाजपेयी यांना `भारतरत्न’चा गौरव मिळावा अशी मागणी या खासदारांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून भाजप कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे. त्यामुळे आता भाजप सत्तेत असल्याने त्यांची ही इच्छा आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता बळावली आहे.

वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान म्हणून काम केले आहे. १९९९ च्या कारगिल युद्धावेळी वाजपेयीच पंतप्रधान होते. त्यामुळे कमी कार्यकाळातही प्रभावी काम करणार्या पंतप्रधानांमध्ये त्यांचा उल्लेख होतो. आता त्यांच्या कार्याला भारतरत्नचं गोंदण मिळण्याची शक्यता व्यक्त होते आहे. येत्या २६ जानेवारीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येण्याची शक्यता आहे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.