www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर कौतुकांचा वर्षाव करणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी आणि टीम अण्णातील सदस्य राहिलेल्या किरण बेदी यांनी राजकारणात शिरकाव करण्याचे संकेत दिलेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण बेदी भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, हर्षवर्धन यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदावर विराजमान होण्याची संधी दिली गेली तर भाजप किरण बेदी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करू शकतं.
आत्ताआत्तापर्यंत किरण बेदी यांनी राजकारणात येण्यासाठी नकारच दिलाय. पण, आता मात्र त्यांचं विचार परिवर्तनाची चिन्हं दिसून येत आहेत. केंद्रातील सत्ता परिवर्तनानंतर किरण बेदी यांचं मत बदललंय. ‘देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आलीय’, असं आता किरण बेदी यांना वाटू लागलंय. भाजपनं प्रस्ताव दिला तर पक्षात सामील होण्याची आपली तयारी असण्याचेही संकेत बेदी यांनी दिलेत. किरण बेदी यांनी यापूर्वीच अनेकदा नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलंय.
‘क्षमतेच्या आधारावर भारतीय राजकारण क्षेत्रात जाण्यासाठी आता माझा नकार नाही. या दिशेनं मी थोडाफार लवचिक भूमिका आत्मसात करतेय’ असं ट्विटही बेदी यांनी यापूर्वी केलं होतं. यावरुनच, बेदी यांना भाजपमध्ये सामील होणार का? असा प्रश्न विचारला गेला असता त्यांनी स्पष्टपणे यावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सक्रिय राहणाऱ्या किरण बेदी यांनी उघडपणे मोदींच्या नेतृत्वाची यापूर्वीही स्तुती केलीय. 16 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर ‘असं वाटतंय देश गेल्या अनेक वर्षांपासून अनाथ होता. शेवटी त्याला पालक मिळालाय जो काळजी घेणारा आणि सक्षम आहे. आता आपण रचनात्मक पद्धतीनं लक्ष देऊ शकतो’ असं किरण बेदी यांनी म्हटलंय.
मंगळवारी, आपमधून बाहेर पडलेले लक्ष्मीनगरचे आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी भाजपा, आप आणि काँग्रेसला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी किरण बेदी यांच्या नावाचा विचार करण्याचा सल्ला दिला होता.
यामुळेच, पुढच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी किरण बेदी एक दमदार उमेदवार असू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.