राजीनाम्यावरून केजरीवालांनी मागितली जनतेची माफी

‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी, दिल्लीत सत्ता अर्ध्यावरूनच सोडणं ही आमची चूक झाली यासाठी आम्ही जनतेकडे माफी मागणार असं म्हणत पुन्हा एकदा निवडणुका लढण्याची तयारी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 21, 2014, 11:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी, दिल्लीत सत्ता अर्ध्यावरूनच सोडणं ही आमची चूक झाली यासाठी आम्ही जनतेकडे माफी मागणार असं म्हणत पुन्हा एकदा निवडणुका लढण्याची तयारी केलीय.
बुधवारी पत्रकारांसमोर बोलताना अरविंद केजरीवाल यांनी, आता दिल्लीत सरकार बनण्याची शक्यता शून्य आहे यासाठी आम्ही पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय. सरकार सोडण्यासाठी मी लोकांची माफी मागतो, असं म्हटलंय.
आम्हाला लोकांकडून पुन्हा एकदा सरकार बनविण्याचा सल्ला दिला जातोय पण आम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहोत, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांनी 14 फेब्रुवारी रोजी त्यागपत्र सादर करत विधानसभा भंग करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे, पुन्हा एकदा निवडणुका घेऊन बहुमतानं निवडून येण्याचं ध्येय समोर ठेवत त्यांनी हा निर्णय घेतला होता. परंतु, विधानसभा भंग केली नाही यामुळे पक्षानं राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली होती.
आम आदमी पार्टीनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विधनासभा निवडणुकीत 28 जागांवर विजय मिळवून भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं होतं. भाजपानं यावेळी 70 पैकी 32 जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये अकाली दलाच्या एका आमदाराचाही समावेश होता. भाजपच्या आमदारांची संख्या आता 28 वर आलीय कारण पक्षाचे आमदार हर्षवर्धन, रमेश विधूडी आणि परवेश वर्मा आता खासदार म्हणून निवडून आलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.