`झी मीडिया`च्या दणक्यानंतर केजरीवाल यांना सुचली उपरती

दिल्लीत मिळालेल्या यशानं आपण हुरळून गेलो नाहीत, लवकरच म्हणजे उद्याच आपण अण्णांची भेट घेणार आहोत, असं यानंतर केजरीवाल यांनी जाहीर केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 11, 2013, 07:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`झी मीडिया`नं केलेल्या कानउघडणीनंतर `आम आदमी पार्टी`चे नेते अरविंद केजरीवाल ताळ्यावर आलेत. दिल्लीत मिळालेल्या यशानं आपण हुरळून गेलो नाहीत, लवकरच म्हणजे उद्याच आपण अण्णांची भेट घेणार आहोत, असं यानंतर केजरीवाल यांनी जाहीर केलंय.
राळेगणसिद्धीमध्ये जनलोकपालसाठी अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले असताना अरविंद केजरीवाल मात्र आपल्या कार्यकर्त्यांसहीत दिल्लीत अजूनही विजयाचा जल्लोषात मश्गुल दिसले. दिल्ली विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तीन दिवस उलटले तरी हा जल्लोष अजून सुरूच आहे. यादरम्यान मात्र अरविंद केजरीवाल यांना आपल्या गुरुची - अण्णांची एकदाही आठवण आली नाही... यादरम्यान ना त्यांनी अण्णांचं नाव घेतलं... ना त्यांना फोन केला... ना भेट घेतली. एवढंच काय तर साधं अण्णांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करावा, एवढी तसदीदेखील त्यांनी घेतली नाही. ही गोष्ट `झी मीडिया`नं निदर्शनास आणून दिल्यानंतर मात्र अरविंद केजरीवाल यांना सदबुद्धी सुचली.
त्यामुळे, `आपला अण्णांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा आहेच... यासाठी आपण उद्याच राळेगणसिद्धीला जाऊन अण्णांची भेट घेणार आहोत` असं उपरती सुचलेल्या केजरीवाल यांनी जाहीर केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.